हा शेवट नसून ही तर फक्त सुरुवात; यश्विनी ढाका यांची लेफ्टनंट म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला 2021मध्ये अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 12 अधिकारी हुतात्मा झाले होते. यामधील एक नाव होते ते म्हणजे स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंह राव यांचे. त्यांची पत्नी यश्विनी ढाका हीदेखील आता लष्कराचा एक भाग बनली आहे. यश्विनी ढाका यांची लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली आहे.
हुतात्मा कुलदीप सिंह हे राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील घरदाना खुर्दचे रहिवासी होते. पतीच्या अखेरच्या प्रवासात यश्विनी यांनी सैन्यात भरती होण्याचे वचन दिले होते. वायु सेनेमध्ये लेफ्टनंट झाल्यानंतर त्या म्हणाल्या की, हा शेवट नसून ही तर फक्त सुरुवात आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. अथक परिश्रमानंतर त्यांनी एसएसबी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी 2023 पासून चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकादमीमध्ये 11 महिने प्रशिक्षण घेतले.
8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंह हुतात्मा झाले होते. त्यानंतर त्यांच्या पार्थिवासमोर यश्विनी यांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची शपथ घेतली होती. दरम्यान, 19 नोव्हेंबर 2019 रोजी मेरठच्या यश्विनी आणि कुलदीप सिंह यांचे लग्न झाले होते. कुलदीप सिंह यांची बहीणही भारतीय तटरक्षक दलात डेप्युटी कमांडंट म्हणून काम करत आहे. दरम्यान, सुनेच्या या सोहळ्यासाठी संपूर्ण परिवाराने हजेरी लावली होती. यश्विनी यांचे कर्तुत्वाचे त्यांच्या कुटुंबासोबतच संपूर्ण देशभरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. हुतात्मा कुलदीप सिंह यांच्या गावातील लोकांनी, यश्विनी यांचे हे पाऊल देशसेवेच्या क्षेत्रात पुढे जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.





