प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी चालक, वाहकांच्या जादा कामाच्या भत्त्याच्या (ओव्हरटाइम अलाउन्स) नियमावलीत बदल केले आहे. तसेच चालक, वाहकांची साप्ताहिक सुट्टी रद्द करू नये, गर्दीच्यावेळी किंवा वारंवार गैरहजर राहणाऱ्यांवरही करडी नजर राहणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तही राहणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दैनंदिन उत्पन्न वाढवण्यासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये ओव्हरटाइम भत्त्यावर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण नसल्याचे समोर आले. त्याबाबत कामगार वर्गाकडून अनेक तक्रारी येत असून, काही मर्जीतील ठराविक चालक, वाहकांनाच हा भत्ता दिला जातो. त्या बदल्यात आर्थिक देवाणघेवाणही होते, असे आरोप करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर या भत्त्यासंदर्भात एक प्रमाण कार्यपद्धती वापरली जावी, असे निर्देश दिले आहेत. आगारांनी चालक/वाहकांची अ, ब, क अशी वर्गवारी करून नोंदवही ठेवावी. ओव्हरटाइमसाठी शक्यतो क गटातील (कमी ओव्हरटाइम दर असलेल्या) कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यास प्लॅन डबल ड्युटीचे नियोजन करावे. यासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागवून ज्यांचे मूळ वेतन कमी आहे, त्यांनाच प्राधान्य देऊन मासिक आराखडा तयार करावा. कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी डबल ड्युटीचे वेळापत्रक १० दिवस आधीच नोटीस बोर्डवर लावणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, ओव्हरटाइम वाटपात कोणताही भेदभाव होऊ नये, यासाठी प्रत्येक आगारात एका विशिष्ट नमुन्यात स्वतंत्र नोंदवही असावी. त्यामध्ये कर्मचाऱ्याचे नाव, बिल्ला क्रमांक, ओव्हरटाइमचा प्रतितास दर आणि रक्कम याची नोंद ठेवावी लागेल. जर ठराविक कर्मचाऱ्यांनाच जास्त ओव्हरटाइम दिला जात असल्याचे आढळल्यास, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश महामंडळ महाव्यवस्थापकांनी (वाहतूक)काढले आहे. सुट्टी रद्द कण्यास बंदी चालक किंवा वाहकांची कोणत्याही परिस्थितीत साप्ताहिक सुट्टी रद्द करू नये. तसे केल्यास पर्यवेक्षकावर कारवाई केली जाईल. तसेच वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. गर्दीच्या दिवशी किंवा सणासुदीला रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रजेच्या कलाचा अभ्यास करून अशा प्रकारांना आळा घालण्यास सांगितले आहे.