Tukaram Mundhe : ‘ही तर केवळ सुरुवात’; FDA चे आयुक्त तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत
Tukaram Mundhe : आता तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अन्न व ओषध प्रशासन अर्थात FDA च्या मार्फत धाडसत्र सुरू असून, भेसळखोरी करण्याविरोधात कडक कारवाई केली जात आहे. या विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली जात आहे.
यामुळे दूध, पनीर, अवैध गुटखा विक्री, खाद्यपदार्थ यामध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंढेंच्या या कार्यवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. या कारवाईमुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जात असल्याची चर्चा आहे. मात्र, कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी याअगोदर अनेकदा सांगितलं आहे. आता तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. (Tukaram Mundhe)
या पोस्टमधून त्यांनी “सार्वजनिक आरोग्य ही केवळ नियामक जबाबदारी नाही; ती मानवी प्रतिष्ठेची बांधिलकी आहे. अन्नामध्ये भेसळ होते, औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड होते किंवा नागरिकांची दिशाभूल होते, तेव्हा त्याची किंमत केवळ आर्थिक नुकसानापुरती मर्यादित राहत नाही; तर जीवितहानी, विश्वासाचा ऱ्हास आणि समाजाच्या कल्याणावर त्याचा परिणाम होतो.” असे म्हटले आहे.
याशिवाय पोस्टमध्ये त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, “आपले ध्येय केवळ कायद्याची अंमलबजावणी करणे इतकेच मर्यादित नाही. आपल्याला अशा संस्था उभाराव्या लागतील ज्या विश्वास निर्माण करतील, प्रामाणिकतेला प्रोत्साहन देतील, नवकल्पनांना चालना देतील आणि प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी नागरिकांना ठेवतील.” अशी एक नवीन संकल्पना त्यांनी पोस्टमधून सुचवली आहे.
नेमकं पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत तुकाराम मुंढे? (Tukaram Mundhe)
एका हिंदी दैनिकात छापून आलेल्या बातमीचा फोटो शेअर करत तुकाराम मुंढे यांनी पोस्ट केली आहे. ही तर केवळ सुरुवात आहे… नेतृत्व म्हणजे केवळ वर्तमानाचे व्यवस्थापन नव्हे; तर भावी पिढ्यांना अधिक निरोगी, सुरक्षित आणि सक्षम समाज देणाऱ्या व्यवस्था निर्माण करणे होय. सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधे ही कुणावर केलेली कृपा नाही; तो प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे.
सार्वजनिक आरोग्य ही केवळ नियामक जबाबदारी नाही; ती मानवी प्रतिष्ठेची बांधिलकी आहे. अन्नामध्ये भेसळ होते, औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड होते किंवा नागरिकांची दिशाभूल होते, तेव्हा त्याची किंमत केवळ आर्थिक नुकसानापुरती मर्यादित राहत नाही; तर जीवितहानी, विश्वासाचा ऱ्हास आणि समाजाच्या कल्याणावर त्याचा परिणाम होतो.
आपले ध्येय केवळ कायद्याची अंमलबजावणी करणे इतकेच मर्यादित नाही.आपल्याला अशा संस्था उभाराव्या लागतील ज्या विश्वास निर्माण करतील, प्रामाणिकतेला प्रोत्साहन देतील, नवकल्पनांना चालना देतील आणि प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी नागरिकांना ठेवतील. अधिक निरोगी भविष्य विश्वास, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सामूहिक जबाबदारी यांवर उभे राहील. आपण आता केवळ सुरुवात केली आहे.






