ये बाबुराव का स्टाईल है.! पांढरी बनियन, जाड भिंगाचा चष्मा…; खऱ्या आयुष्यातले ‘बाबुराव’ नेमके कोण? परेश रावलनं केला खुलासा

Paresh Rawal | Rajat Dholakia | Hera Pheri : बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या त्रिकुटाची अॅानस्क्रीन केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुर झाले असतानाच अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटातून माघार घेतली आहे. यामुळे सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी ‘हेरा फेरी 3’ ची घोषणा केल्यानंतर चित्रपटावर काम करण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र, परेश रावल यांनी अचानक चित्रपटातून एक्सिट घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ‘हेरा फेरी’ फ्रँचायझीतील परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तीन अभिनेत्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यातील एकाही अभिनेत्याने एक्सिट घेतली, तर ती प्रेक्षकांसाठी निराशाजनक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे परेश रावल यांनी घेतलेला हा निर्णय चाहत्यांना न पटणारा आहे.
परेश रावल यांना ‘बाबुराव आपटे’ या भूमिकेतून कमालीची लोकप्रियता मिळाली. बाबुराव या भूमिकेत त्यांच्याशिवाय इतर कोणाचीच कल्पना होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहितीये का बाबुरावची स्टाईल ही खऱ्या आयुष्यातील एका व्यक्तीवरुन प्रेरित आहे. स्वतः परेश रावल यांनी बद्दल खुलासा केला आहे.
अभिनेते परेश रावल हे त्यांचे जवळचे मित्र आणि अभिनेता विजय केंकरे यांच्यासोबत ‘कोण होणार मराठी करोडपती’ या शोमध्ये सामील झाले होते. परेशने पहिल्यांदाच एका मराठी कार्यक्रमात भाग घेतला आणि आपला आनंद सूत्रसंचालक सचिन खेडेकरसोबत शेअर केला. गेम खेळण्यासोबतच, परेशने इंडस्ट्रीतील त्यांच्या कारकिर्दीबद्दल, सुरुवातीच्या दिवसांबद्दल, हेरा फेरीमध्ये बाबुरावची भूमिका मिळण्याबद्दल आणि इतर बऱ्याच गोष्टींबद्दल अनेक खुलासे केले.
यावेळी परेश यांनी सर्वांना सांगितले की, हेरा फेरीमध्ये बाबुरावची भूमिका कशी मिळाली आणि ते म्हणाला, “विलेपार्लेमध्ये एक व्यक्ती आहे आणि असाच एक माणूस आहे, त्याचे नाव ‘रजत ढोलकिया’ आहे ज्याचे व्यक्तिमत्त्व अगदी बाबुरावांसारखे आहे. आम्हाला त्याच्यात ते पात्र सापडले. राजा त्याच्यासारखाच आहे आणि मी हेरा फेरीमध्ये त्याच्या व्यक्तिरेखेची नक्कल करण्याचा निर्णय घेतला. त्याची चालण्याची शैली आणि व्यक्तिमत्त्व, मी माझ्या व्यक्तिरेखेत ते साकारण्याचा प्रयत्न केला.” असं स्वतः परेश रावल यांनी सांगितलं आहे.
कोण आहे ‘रजत ढोलकिया’ व्यक्ती?
गुजराती थिएटरमधील प्रसिद्ध संगीतकार ‘रजत ढोलकिया’ यांच्यावरुन हे पात्र प्रेरित आहे. त्यांना सगळे प्रेमाने ‘जुकू’ म्हणतात. पांढरी बनियन, जाड भिंगाचा चष्मा अशाच अवतारात रजत ढोलकिया दिसतात. एवढंच काय तर त्यांची बोलण्याची स्टाईलही अगदी तशीच आहे. जेव्हा रजत ढोलकियांना हे कळलं की आपल्यावरुनच हे बाबुराव कॅरेक्टर घेण्यात आलं आहे तेव्हा तेही खूप हसले.
रजत ढोलकिया यांनी ‘धारावी’, ‘होली’, ‘मिर्च मसाला’, ‘ 1942 अ लव्ह स्टोरी’ सारख्या सिनेमांमध्ये संगीत दिग्दर्शन केलं आहे. गंमत म्हणजे परेश रावल यांनी डॉमिनॉज पिझ्झाची ‘पिझ्झा आये फ्री’ जाहिरात केली. या जाहिरातीचं जिंगल रजत ढोलकिया यांनीच कंपोज केलं होतं.





