Ladaki Bahin Yojana: हा तर पैशांचा अपव्यय…, लाडकी बहिण योजना येणार अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल, वाचा सविस्तर….

Ladaki Bahin Yojana – राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू केल्याचा आरोप करत विरोधक करत आहेत. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतुदीसंदर्भात अडचण असल्याचे अर्थ विभागाने म्हटले होते. यानंतर आता योजनेविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
यामुळे राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली असून मंगळवारी (६ ऑगस्ट) सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यासंदर्भात नवी मुंबईतील एका चार्टर्ड अकाऊंटंटनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. या याचिकेत लाडकी बहीण योजना आत्ताच का लागू केली? हा तर करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केल्यानंतर यावर तत्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. यावेळी याचिकेवर सुनावणीस एवढी घाई का? असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने तत्काळ सुनावणीची मागणी फेटाळून लावली आहे.
लाडकी बहीण योजना ही करदात्यांच्या पैश्याचा अपव्यय आहे. तसेच या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे. तसेच १४ ऑगस्टला वितरीत होणाऱ्या योजनेच्या पहिल्या हफ्त्यावर स्थगिती देण्याची मागणी याचिकेत केली आहे.
या योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार की नाही, याचा निर्णय सुनावणीनंतर होणार आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरु केली आहे. ही भ्रष्ट कृती असून हा मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे.
निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते. मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू नसल्यामुळे निवडणूक आयोग कारवाई करु शकत नाही, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.





