Dia Mirza Video : “हा प्रश्न छोटा आहे, त्या काही देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत..”; दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडिओवर CM फडणवीस स्पष्टच म्हणाले…
न्यायालयाच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी या प्रकरणाला फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचं सांगितलं.

Dia Mirza Video : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा एक व्हिडीओ सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीत फटाके फोडू नका, ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळा, असं आवाहन करणाऱ्या दियाच्या व्हिडीओने आधी सोशल मीडियावर लक्ष वेधलं आणि त्यानंतर थेट राजकीय वादाला तोंड फुटलं.
मुंबई महानगरपालिकेनेच पोस्ट केलेला हा व्हिडीओ भाजप नेत्यांच्या आक्षेपानंतर अचानक हटवण्यात आला. त्यामुळे अभिनेत्रीला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा अधिकार नाही का, असा सवाल उपस्थित होऊ लागला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानेही महापालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत व्हिडीओ पुन्हा प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे, न्यायालयाच्या या भूमिकेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा वाद फारसा महत्त्वाचा नसल्याचं सांगत, ‘हा आमच्या स्तरावरील विषय नाही’, असं म्हटलं आहे. त्यामुळे दिया मिर्झाच्या एका व्हिडीओवरून सुरू झालेला हा वाद आता आणखी चर्चेत आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील वाढत्या वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा, प्रदूषण कमी करण्यासाठी सहकार्य करावं आणि आरोग्याची काळजी घेत सण साजरा करावा, असं आवाहन करण्यात येत होतं.
यासाठी महापालिकेने अभिनेत्री दिया मिर्झा, माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड, तसेच क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. याच मोहिमेअंतर्गत दिया मिर्झाने मुंबईकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देत फटाके न फोडण्याचं आवाहन केलं होतं.
‘फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण आपल्या सर्वांसाठी हानिकारक आहे. दिवाळी आवाजांनी नाही, तर आनंदाने साजरी करा’, असा संदेश तिने आपल्या व्हिडीओतून दिला होता. मात्र, तिच्या या आवाहनावरून राजकीय वाद निर्माण होईल, याची कदाचित कुणालाच कल्पना नव्हती.
अमित साटम यांच्या एका पोस्टने वादाला सुरुवात
दिया मिर्झाचा व्हिडीओ मुंबई महापालिकेने पोस्ट केल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी सोशल मीडियावर आक्षेप नोंदवला. ‘दिवाळी कशी साजरी करायची, याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी एक्सवर केली.
अमित साटम यांच्या या पोस्टनंतर काही तासांतच मुंबई महानगरपालिकेने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवला. विशेष म्हणजे, याच मोहिमेतील इतर सेलिब्रिटींचे व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर कायम होते. त्यामुळे केवळ दियाचाच व्हिडीओ का हटवण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला. या निर्णयामुळे सोशल मीडियावरही संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.
हायकोर्टाने व्यक्त केली तीव्र नाराजी; व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे निर्देश
या संपूर्ण प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे विरोध करण्याची गरज काय, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
‘प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न असताना अशा विचारांना वाव देऊन समाजात गटबाजी किंवा फूट निर्माण होण्याची गरज नाही. प्रत्येकाला जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचा अधिकार आहे’, अशा आशयाची भूमिका न्यायालयाने मांडली.
तसेच, दिया मिर्झाचा हटवलेला व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर प्रसारित करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले. भारताच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांचा संदर्भ देत पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाला राजकीय किंवा धार्मिक रंग देऊ नये, असा स्पष्ट संदेशही न्यायालयाच्या निरीक्षणातून देण्यात आला.
फडणवीसांनी प्रकरणाला म्हटलं ‘छोटा विषय’
दरम्यान, न्यायालयाच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी या प्रकरणाला फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचं सांगितलं. पुण्यात हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पणानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला वाटत नाही की न्यायालयाने याप्रकरणी फटकारले असेल. त्यांनी आपलं मत व्यक्त केलं असेल. मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही. व्हिडीओ डिलीट केला, ही मुंबई महापालिकेची मर्जी आहे. मुंबई महापालिकेने जे ठरवलं, त्यांना जे योग्य वाटलं, ते त्यांनी केलं. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर काय ठेवायचं आणि काय काढायचं, याचा अधिकार त्यांना आहे.”
पुढे दिया मिर्झाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “दिया मिर्झा या चांगल्या आणि प्रथितयश अभिनेत्री असतील; पण त्या काही देशाच्या मोठ्या नेत्या नाहीत. हा प्रश्न इतका छोटा आहे की, आमच्या पातळीवरील हा विषय नाही.” असं फडणवीस म्हणाले.







