Vijay Wadettiwar : ..हा तर मध्यवर्गीयांविरुद्धचा कट; रेडी रेकनर दरवाढीवरून विजय वडेट्टीवार यांचा आरोप

नागपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी रेडी रेकनरमधील दरवाढीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. महायुती सरकारने रेडी रेकनरमध्ये दरवाढ करून गरीब व मध्यमवर्गीयांच्या घरांच्या स्वप्नावर घाला घातला आहे, असे ते म्हणाले आहेत. वडेट्टीवार यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी उपरोक्त आरोप केला.
यावेळी त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे व भाजप आमदार सुरेश धस यांच्यातील वादावरही भाष्य केले. हे दोघेही सत्तेत गुंडगिरी करणारी माणसे आहेत. पण धस यांनी केलेल्या गंभीर आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. वडेट्टीवारांनी यावेळी कॉमेडियन कामराच्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांना नोटीस बजावल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे सांगून देशात हुकूमशाही आणि गुंडशाहीचे राज्य आल्याचा आरोप केला.
राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलताना त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोल दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. राज्य डबघाईला आल्यामुळे सामान्य माणसाची लूट करून महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणार
विजेच्या दरकपातीबाबत त्यांनी सांगितले की, दर कमी होत असल्याचा आनंद आहे. मात्र आधी किती वाढवले आणि आता किती कमी केले याचाही अभ्यास व्हायला हवा. खाजगी क्षेत्रातील आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी जयराम रमेश यांच्या मागणीला पाठिंबा दिला. दोन लाख पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात असल्याने आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





