Sanjay Raut : ‘हा महाराष्ट्रद्रोह, जनता माफ करणार नाही!’ संजय राऊतांची पवार गटावर सडकून टीका
Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून देशभरात डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी एनडीएकडून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, विधेयकासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीने इतर पक्षांच्या खासदारांशीही संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे.

Sanjay Raut : डिलिमिटेशन (delimitation) विधेयकावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या विधेयकाबाबतची भूमिका आणि भाजपला मिळू शकणारा संभाव्य पाठिंबा यावरून आता महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“ज्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तुमचा पक्ष फोडला, तुमचं कुटुंब फोडलं, त्यांच्याच चरणाशी जाणं म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखं आहे. तुम्ही केवळ सत्तेसाठी भाजपसोबत जाणार असाल, तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही,” अशा कठोर शब्दांत संजय राऊत यांनी पवारांवर निशाणा साधला. भाजपशी हातमिळवणी करणे हा महाराष्ट्रद्रोह असल्याची टीकाही त्यांनी केली. (Sanjay Raut)
गेल्या काही दिवसांपासून देशभरात डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी एनडीएकडून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, विधेयकासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीने इतर पक्षांच्या खासदारांशीही संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य भूमिकेमुळे इंडिया आघाडीतील मतभेद समोर येऊ लागले आहेत. (Sanjay Raut)
संजय राऊत यांनी शरद पवारांना अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचीही आठवण करून दिली. “तुम्ही भाजपला मदत करणार असाल, तर सर्वप्रथम अनिल देशमुख यांची माफी मागितली पाहिजे. भाजप आणि अमित शाह यांच्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. नवाब मलिक यांचीही माफी मागितली पाहिजे. हे दोन्ही नेते अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रवृत्तींविरोधात लढत होते. त्यानंतरही तुम्ही त्यांच्यासोबत जाणार असाल, तर हा महाराष्ट्रद्रोह आहे,” असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut)

Sanjay Raut : ‘हा महाराष्ट्रद्रोह, जनता माफ करणार नाही!’ संजय राऊतांची पवार गटावर सडकून टीका
पुढे बोलताना त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असेल, तर तो पक्षाच्या विचारधारेच्या आणि महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. अशा पक्षांनी फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये, अशी टीकाही राऊत यांनी केली. (Sanjay Raut)
तसेच लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आले असून, त्यातील पाच जागांवर भाजपच्या उमेदवारांचा पराभव केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यामुळे आता एकतर्फी निर्णय घेऊन सरकारच्या बाजूने उभे राहणार असाल, तर महाराष्ट्रातील जनता हे सहन करेल असे वाटत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (Sanjay Raut)
दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ संसदेपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्याचे पडसाद महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या राजकारणातही उमटताना दिसत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अंतिम भूमिका काय असणार आणि या वादाचा आघाडीच्या एकजुटीवर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Sanjay Raut)





