“हा सन्मान भारताच्या १४० कोटी जनतेचा..”; ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान !

ब्रासिलिया – ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस प्रदान केला. हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान केल्याबद्दल ब्राझीलचे अध्यक्ष,सरकार आणि ब्राझीलच्या जनतेचे पंतप्रधानांनी मनापासून आभार मानले. हा सन्मान भारताच्या १४० कोटी जनतेला आणि भारत आणि ब्राझीलमधील मैत्रीच्या शाश्वत बंधांना समर्पित आहे,असे हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी नमूद केले.
अध्यक्ष लूला हे भारत-ब्राझील धोरणात्मक सहकार्याचे शिल्पकार आहेत आणि हा पुरस्कार म्हणजे या द्विपक्षीय संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचाही सन्मान आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. हा पुरस्कार दोन्ही देशांच्या लोकांना त्यांचे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणा देईल,अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली.
पंतप्रधान आणि अध्यक्ष लूला यांनी मर्यादित आणि प्रतिनिधीमंडळ पातळीवर चर्चा केली आणि भारत आणि ब्राझीलमधील बहुआयामी धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. त्यांनी भारत-ब्राझीलमधील मैत्रीपूर्ण संबंधांना आधार देणाऱ्या सामायिक मूल्यांना पुन्हा एकदा अधोरेखित केले.
व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, आरोग्य आणि औषधनिर्माण, अवकाश, अक्षय ऊर्जा, शेती आणि अन्न प्रक्रिया, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा विकास, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि यूपीआय, पारंपारिक औषध, योग, क्रीडा, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रातील सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यांनी महत्वपूर्ण खनिजे, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, एआय आणि सुपरकॉम्प्युटर, डिजिटल सहयोग आणि गतिशीलता यासारख्या सहकार्याच्या क्षेत्रांमध्ये नवीन संधींचा शोध घेतला.
दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि व्यावसायिक बाबींवर चर्चा करण्यासाठी मंत्रीस्तरीय यंत्रणा स्थापन करण्याचे स्वागत केले. त्यांनी भारत-मर्कोसुर प्राधान्य व्यापार कराराच्या विस्तारासह द्विपक्षीय व्यापार मजबूत करण्यावर चर्चा केली. पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट नेत्यांनी ठेवले. ऊर्जा क्षेत्रातील वर्तमान सहकार्याचा आढावा घेत, दोन्ही नेत्यांनी हायड्रोकार्बन तसेच अक्षय ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये प्रचंड क्षमता असल्याने गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्यावर सहमती दर्शविली.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. त्यांनी बहुपक्षीयता आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा करण्यासाठी वचनबद्धताही दर्शवली. चर्चेनंतर,दहशतवादविरोधी, सुरक्षा क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण, कृषी संशोधन, अक्षय ऊर्जा, बौद्धिक संपदा हक्क आणि डिजिटल सहकार्य या क्षेत्रातील सहा सामंजस्य कराराला अंतिम रुप देण्यात आले.
दहशतवादाच्या मुद्दयावर एकमत
एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे आभार मानले. दहशतवादा बाबत अजिबात सहनशीलता नसावी आणि अशा अमानवी कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. दहशतवादाशी लढण्यासाठी आणि त्याचा पराभव करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र आणि जागतिक समुदायासोबत काम केले पाहिजे यावर अध्यक्ष लूला यांनी सहमती दर्शवली.





