Anjali Anand : कोरोना काळात पैसे संपले, बॅालिवूडला रामराम करणार होती ही अभिनेत्री ; करण जोहरने दिली संधी अन् नशीब बदललं
Anjali Anand : दिग्दर्शक करण जोहरने तिला एका चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.

Anjali Anand : मनोरंजनसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करणं हे अनेक कलाकारांसाठी आव्हानात्मक असतं. काही कलाकार या संघर्षाला सामोरं जात यश मिळवतात, तर काही जण परिस्थितीमुळे इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतात. अभिनेत्री अंजली आनंद हिच्यासोबतही करिअरच्या सुरुवातीला अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, दिग्दर्शक करण जोहरने तिला एका चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.
याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंजली आनंदने खुलासा केला. दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खानने अंजलीच्या मुंबईतील घरी भेट दिली. या भेटीदरम्यान फराह खानने अंजलीच्या घराची खास झलक दाखवली. दोघींमध्ये झालेल्या संवादादरम्यान अंजलीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक अनुभव सांगितले.
फराहने अंजलीला विचारलं की तिला रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात भूमिका कशी मिळाली. फराह खानच्या प्रश्नाला उत्तर देताना अंजली म्हणाली, “२०२० मध्ये मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जात होते. मी भारत आणि अभिनय पूर्णपणे सोडून देण्याचा विचार करत होते. मला चित्रपटांमध्ये कोणतीही भूमिका मिळत नव्हती. लॉकडाऊन होता आणि माझे पैसे संपले होते. सहा महिन्यांत माझी सगळी बचत संपली होती.”
अंजली पुढे म्हणाली, “मला आठवतंय, माझ्या मैत्रिणी मला गोव्याला घेऊन गेल्या होत्या आणि तिथे मला शानूचा एक मेसेज आला. मी तिला नेहमी भेटते आणि जेव्हाही भेटते, तेव्हा ती म्हणते, ‘वजन कमी कर, आपण काहीतरी करूया.’ माझ्या आईलाही शंका होती. ती म्हणाली, ‘तू करण जोहरला भेटायला आली आहेस, त्याला का बोलावणार?’ पण करणला माझे फोटो आणि ऑडिशन खूप आवडले आणि त्यानंतर मला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये भूमिका मिळाली.”
अंजली आनंदने बेल बॅाटम, बन टिक्की, धमाल ४ या चित्रपटात काम केले आहे. यासह तिने प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेल्या वेबसिरीजमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आगामी काळातही अंजली मोठ्या प्रोजेक्टचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.
Love & War Film: ‘लव्ह अँड वॉर’मधील आलिया भटचा पहिला लुक समोर; अभिनेत्री जीनत अमान यांच्याकडून कौतुक




