Govinda: पत्नी सुनीता आधीच पोहोचली, मग गोविंदा कोमलसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला का गेला? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
Govinda विशेष म्हणजे, गोविंदाच्या भेटीच्या काही तास आधी त्याची पत्नी सुनीता आहुजा देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकटीच पोहोचली होती. त्यामुळे गोविंदा पत्नीऐवजी कोमलसोबत दर्शनासाठी का गेला, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

Govinda: बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण त्याचा कोणता चित्रपट नाही, तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी त्याने दिलेली भेट आहे. २२ सप्टेंबर रोजी गोविंदा त्याच्या ‘रूपा’ चित्रपटातील सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली.
विशेष म्हणजे, गोविंदाच्या भेटीच्या काही तास आधी त्याची पत्नी सुनीता आहुजा देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकटीच पोहोचली होती. त्यामुळे गोविंदा पत्नीऐवजी कोमलसोबत दर्शनासाठी का गेला, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
कोमलसोबत दर्शनाला जाण्याचं कारण काय?
गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर यांनी ‘रूपा’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दोघे एकत्र गेल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा रंगली. गोविंदाने मात्र या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने सांगितलं की, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाण्यामागे कोणताही वैयक्तिक मुद्दा नव्हता. तो आपल्या आगामी ‘रूपा’ चित्रपटासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे गेला होता.
गोविंदाने सांगितलं की, याआधीही तो करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला आहे. अशा भेटींमुळे आपल्या चित्रपटांना सकारात्मक ऊर्जा मिळते, असा त्याचा विश्वास असल्याचं त्याने सांगितलं.

Govinda and Komal Rani Swarnkar
‘रूपा’साठी घेतला बाप्पाचा आशीर्वाद
गोविंदा बऱ्याच काळानंतर पुन्हा चित्रपटात काम करत आहे. त्यामुळे ‘रूपा’ या चित्रपटासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी तो लालबागच्या राजाच्या चरणी पोहोचला होता. दर्शन घेतल्यानंतर गोविंदाने अंतिम आरतीमध्येही सहभाग घेतला. यावेळी तो कोमलसोबत दिसल्याने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या.
गोविंदाने अफेअरच्या चर्चेवरही केलं भाष्य
कोमलसोबतच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर गोविंदाने थेट भाष्य केलं. त्याने सांगितलं की, आपल्याला कुटुंबापासून दूर करण्याचा आणि समाजात आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्याला वाटतं.
गोविंदाने पुढे म्हटलं की, त्याने आयुष्यभर आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे आणि तो सतत काम करत आहे. कोमलसोबतच्या नात्याबद्दलच्या चर्चांवर बोलताना त्याने असंही म्हटलं की, “असेल आमचं अफेअर तरी, मी काम करत आहे आणि व्यावसायिक संबंधही जपत आहे.” त्यामुळे गोविंदाने या चर्चांना फारसं महत्त्व न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश दिला आहे.
‘रूपा’कडून मोठ्या अपेक्षा
गोविंदाचा ‘रूपा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे तो बऱ्याच काळानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि कोमल राणी स्वर्णकरसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या चर्चांपेक्षा चित्रपटातील गोविंदाचा अभिनय आणि ‘रूपा’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.




