थर्टी फर्स्ट, नववर्षाची पार्टी करणाऱ्यांना मिळणार सवलत

तीन दिवस सवलतींचा भडिमार : बिअर बार पहाटे पाचपर्यंत, मद्यालये रात्री एकपर्यंत सुरू
दत्तात्रय गायकवाड
वाघोली – डिसेंबर महिना आला की तरूणाईला वेध लागतात थर्टी फर्स्टला निरोपाची आणि नववर्षाच्या स्वागताची. या दोन दिवसासाठी तरूणवर्ग एक महिनाअगोदरच नियोजन करीत असतो. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर महिन्यात तीन दिवस सवलत दिली आहे. दि. 24, 25, 31 असे तीन दिवस पहाटे पाचपर्यंत बार तर मद्यालये रात्री एकपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या तयारीसाठी तरूणाई एकवटली असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
गेल्या 25 वर्षांत पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यासाठी तरूणांमध्ये “क्रेझ’ निर्माण झाली आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरूण रात्र जागवून काढत आहेत. बेधुंद तरूणाई रात्रभर या जल्लोषात रममाण होऊन जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एक महिनाअगोदर याचे नियोजन करण्यात महाविद्यालयीन तरूण आणि तरूणी यात सहभागी होत आहेत.
गेल्या 17 ते 18 वर्षांत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा चेहरामोहरा बदलत गेला आहे. त्यात औद्योगिकीकरणामुळे नागरिकांचे राहणीमान उंचावले आहे. तसेच पाश्चात्य संस्कृतीला कवटाळणारी तरूणाई याकडे आकृष्ट होत आहे. त्यामुळे तरूणाईमध्ये ट्रेंड निर्माण झाला आहे. बारामती, इंदापूर, शिरूर, खेड, हवेली, मुळशी हे तालुके प्रगतशील आहेत. या भागात नागरिकीकरणाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे आर्थिकस्तर बदलला आहे. तसेच माहिती आणि मनोरंजनाच्या विश्वात मश्गूल होणाऱ्या तरूणांना थर्टी फर्स्टचे हटकून वेध लागत आहेत.
दरवर्षी राज्य शासनाला भरघोस महसूल मिळवून देणाऱ्या थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागत सोहळ्यातून महसूल राशी ओतल्या जात आहेत.सध्या राज्याच्या तिजोरीत असलेला खडखडाट पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बिअर बार आणि मद्यालये रात्री सुरू राहण्याबाबत सवलत दिली आहे. त्यामुळे तरूणाईला मद्याचे प्याले रिचवता येणार आहे. ही मद्यालये आणि बिअर बार दि.24 आणि 25 आणि 31 डिसेंबर रोजी सुरू राहणार आहेत. या कालावधीत मद्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाचा फंडा चांगलाच उपयोगी येणार आहे.
तरूणाईला ही खुशखबर असताना तरूणाई व्यसनाच्या चक्रात गुरफुटून जाणार आहे, याचे भान संबंधित विभागाने सोडले आहे. नववर्ष स्वागत समारंभासाठी आता एक दिवसाचे परवाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक कार्यालयात हे परवाने देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पंचताराकिंत हॉटेलबरोबर देशी- विदेशी दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांना परवाने वितरित करण्यात आले आहेत.
सामाजिक संस्थांकडून प्रबोधनाची झालर
थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी तरूणाई एकत्र येत आहे. त्यातून तरूणवर्ग व्यसनाच्या आहारी जात असताना जिल्ह्यासह शहरातील सामाजिक संस्थांकडून थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागत सोहळ्याला येणारी झिंग रोखण्यासाठी सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. या संस्था या दोन्ही दिवशी दुधाचे वाटप करीत आहे. हा उपक्रम समाजातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. थर्टी फर्स्टला झिंगाट होऊन नाचणाऱ्या तरूणाईमध्ये पाश्चात्य संस्कृतीमधील कुप्रथा थांबविण्यासाठी प्रबोधन करीत आहेत. हे काम समाजातील व्यसनाधीनता रोखण्यासाठी योगदान देत आहे.





