कानकात्रे तलावावर तेरा वर्षांनी फ्लेमिंगोंचे आगमन

महेश जाधव
पक्षी निरीक्षक, पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
मायणी – मायणी (ता. खटाव) पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कानकात्रे येथील तलावावर तब्बल तेरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. हजारो किलोमीटर प्रवास करून फ्लेमिंगो किंवा अग्निपंख किंवा रोहित पक्षी या परिसरात दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसांत हे पक्षी मायणी तलावावर येतील.
त्यामुळे पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पर्यटकांना हे पक्षी पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. मायणीजवळच्या कानकात्रे तलावाच्या परिसरात यापूर्वी 2007 मध्ये रोहित पक्ष्यांचे आगमन झाले होते. त्यानंतर या भागात कायम दुष्काळी परिस्थिती राहिल्याने 2007 नंतर रोहित पक्षी येथे आले नव्हते. 2014 मध्ये या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता तरीही रोहित पक्ष्यांचे आगमन झाले नव्हते.
मात्र, येरळवाडी, धोंडेवाडी, सूर्याचीवाडी येथील तलावांमध्ये जेव्हा केव्हा पाणीसाठा होत होता, त्यावेळी रोहित पक्षी तेथे वास्तव्यास येत होते. गेल्या वर्षी मायणीसह इतर भागात भरपूर पाऊस झाल्याने मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हे रोहित पक्षी तब्बल तेरा वर्षांनंतर मायणीजवळील कानकात्रे तलावाच्या परिसरात वास्तव्यास आले आहेत. हे पक्षी येत्या काही दिवसात मायणी येथील तलावाच्या परिसरात वास्तव्याला येतील, अशी अपेक्षा आहे.
मायणी येथे पक्षी आश्रयस्थान असून येथे नेहमी फ्लेमिंगोचे आगमन होत होते; परंतु गेल्या 13 वर्षांत या भागात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे तलावात पाणीसाठा होत नव्हता. त्यामुळे येथील फ्लेमिंगोंनी या तलावाकडे पाठ फिरवली होती. यावर्षी मायणी तलावाबरोबरच कानकात्रे तलावात भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे.
त्यामुळे फ्लेमिंगोनी येथे दाखल झाले आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो कानकात्रे तलावाच्या आश्रयाला आल्याने पक्षीप्रेमी, पर्यटक व छायाचित्रकारांची पावले या तलावाच्या दिशेने वळत आहेत. दरम्यान, इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकात मायणी परिसरामध्ये फ्लेमिंगोच्या वास्तव्याची सचित्र माहिती दिली आहे.
इतर पक्षीही कानकात्रे तलावाच्या आश्रयाला
फ्लेमिंगोबरोबर नाम्या, सुरुची, नकटा, चक्रवाक, शराटी, नदी सूरय, पाणकोंबड्या, चमचचोच्या, राखी बगळा, पांढऱ्या मानेचा करकोचा, टिबुकली, रंगीत करकोचा, जांभळी खंड्या, करकोचा, तूतवार, तापस तुतारी आदी पक्षीही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
येरळवाडी, धोंडेवाडीतही फ्लेमिंगोंचे आगमन
कानकात्रे तलावावर अग्निपंखचे आगमन झाल्याने पक्षीप्रेमींची पावले तलावाच्या दिशेने पडत आहेत. फ्लेमिंगोच्या आगमनामुळे खटाव तालुक्याच्या नैसर्गिक वैभवात पुन्हा भर पडणार आहे. पर्यटक, पक्षी निरीक्षक व पक्षीप्रेमींना निसर्गाने संधी उपलब्ध करून दिली आहे. मायणी, येरळवाडी व धोंडेवाडी येथील तलावांमध्ये पाणीसाठा झाल्याने फ्लेमिंगोंनी हजेरी लावली आहे.





