काँग्रेस उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता; कोणाला मिळणार संधी?

Congress Candidates Third List| लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली जात आहे. यापूर्वी काँग्रेसने दोन याद्यातून कोणाला कोठून उमेदवारी दिली जाणार हे सांगितले होते. तर मंगळवारी (19 मार्च) आणखी 30 जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. बुधवारी (20 मार्च) केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीनंतर पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करू शकतो, असे मानले जात आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज पुन्हा बैठक होणार आहे. ज्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील 45 जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर पुन्हा चर्चा होणार आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरमपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अधीर रंजन चौधरी यांनाच तिकीट देण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण यांना कर्नाटकातील कलबुर्गीमधून उमेदवारी दिली जाऊ शकते.
मंगळवारच्या बैठकीत केंद्रीय निवडणूक समितीने पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, पुद्दुचेरी, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमधील उमेदवारांबाबतही प्राथमिक चर्चा केली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा जागांवरही चर्चा झाली. यामध्ये सिक्कीम विधानसभेच्या 18 जागांवर निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी दोन याद्या जाहीर
काँग्रेसच्या उमेदवारांची ही तिसरी यादी असेल. आतापर्यंत काँग्रेस पक्षाने दोन टप्प्यात 82 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने पहिल्या यादीत 39 तर दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत राहुल गांधींच्या नावाचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक समिती मध्य प्रदेशातील 15, राजस्थानमधील 15 आणि गुजरातमधील 15 जागांवर आज पुन्हा विचार करणार आहे.
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर उमेदवारी अर्जांची छाननी 28 मार्च रोजी होणार असून उमेदवारी अर्ज परत करण्याची तारीख 30 मार्च निश्चित करण्यात आली आहे. देशात एकुण सात टप्प्यात मतदान पार पडणार असून 4 जून रोजी एकाच वेळी निकाल जाहीर होणार आहेत.
हेही वाचा:
लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात ; पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, जाणून घ्या पुढे काय होणार?





