वडगाव मावळ : तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव मावळ शहरात आता सुरक्षेचा तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतून व माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पाठपुराव्याने हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात असल्याची माहिती ढोरे यांनी दिली. वडगाव मावळ हे महसूल केंद्र असून तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक येथे येत असतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, अशी मागणी अनेक सामाजिक, राजकीय संघटना व व्यक्ती यांच्याकडून होत होती. त्यानुसार आता वडगाव मावळ शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. वडगाव शहरामधील विद्यार्थीनी, महिला यांसह सर्वच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून नगरपंचायतीकडे शहरातील महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत १७ मार्च २०२३ मध्ये झालेल्या सभेत वरील विषयाला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर नगरपंचायत फंडातून सुमारे १ कोटी ५७ लक्ष इतका निधी याकरीता मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात प्रथम मुख्य बाजारपेठ भागातील पंचायत समिती चौक, वडगाव न्यायालय, श्री पोटोबा महाराज मंदिर, जामा मस्जिद परिसर, भाजी मंडई, खंडोबा चौक, महादजी शिंदे उद्यान या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेमध्ये निश्चितच वाढ होऊन शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असताना हे अत्यंत महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. प्रकल्प अहवालानुसार संपूर्ण सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी आणखीन निधीची आवश्यकता असून येत्या काळात नगरपंचायत व आमदार निधीतून ही कामे होतील, असा विश्वास वडगावकर नागरिकांना आहे. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार महिलांसोबत छेडछाड, सोनसाखळी चोरी, पाकीटमारी, हाणामारी आदी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वडगाव शहरामध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची मागणी होत होती. यासाठी नगरपंचायत फंड व्यतिरिक्त आमदार सुनील शेळके यांनी आमदार निधीमधून व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासित केले. शहरातील शासकीय कार्यालये, महाविद्यालये, रुग्णालये व इतर महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव हे सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात शहरातील पंचायत समिती चौक, वडगाव न्यायालय, श्री पोटोबा महाराज मंदिर, जामा मस्जिद परिसर, भाजी मंडई, खंडोबा चौक, महादजी शिंदे उद्यान याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यानंतर पुढील काही दिवसात कातवी, विशाल लाॅन्स, माळीनगर, न्यू इंग्लिश स्कूल, केशवनगर यांसह इतर काही मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. – मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ प्रवीण निकम