Pune District : मांजरवाडी येथे सलग तिसरी तर नारायणगाव येथील औटी मळ्यात एक बिबट मादी जेरबंद

ओझर : मांजरवाडी (ता. जुन्नर )परिसरात तिसरी बिबट मादी गुरुवार दि ९ ऑक्टोबर रोजी मांजरवाडी व जाधववाडी च्या सीमेवर अशोक टेमगिरे यांच्या बटाट्याच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आली असून ती दीड वर्षाची आहे. तर नारायणगाव येथील औटी मळ्यात सुभाष चंद्रसेन औटी यांच्या घराजवळ धुमाकूळ घालणारी मादी उमेश डेरे यांच्या सिताफळ बागेत बिबट वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये शनिवार दि ११ रोजी जेरबंद करण्यात जुन्नर वनविभागाला यश आले आहे. जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे पिंजरे त्या ठिकाणी लावण्यात आले होते.
मांजरवाडी या ठिकाणी वन विभागाने यापूर्वी सलग दोन बिबट मादी जेरबंद केले असून पकडण्यात आलेली ही तिसरी बिबट मादी आहे. दरम्यान,नारायणगाव येथील औटी मळ्यात उमेश डेरे,सुभाष औटी, ग्रामपंचायत सदस्य भागेश्वर डेरे महेश डेरे यांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. काही दिवसापूर्वी या ठिकाणीच सी सी टी व्ही मध्ये बिबट्या कैद झाला होता.
पकडण्यात आलेल्या या दोन्ही बिबट मादीला बिबट निवारण केंद्र येथे नेण्याकरिता रेस्क्यू टीम सदस्य तुषार टेके, रामकृष्ण चोपडा, पोलीस पाटील सचिन टावरे, आपदा मित्र सुशांत भुजबळ, आदित्य डेरे,शंतनू डेरे, ग्राम पंचायत सदस्य उदय खंडागळे यांनी मदत केली.
नागरिकांनी या भागांमध्ये सतर्क रहावे रात्रीच्या वेळेस काळजी घ्यावी लहान मुलांची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी केले आहे.तर बिबट संदर्भात तसेच इतर अन्य वन्य प्राण्यांसंदर्भात काही माहिती मिळाल्यास वनविभागाशी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जुन्नर वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.
कामगिरीचे विशेष कौतुक
नारायणगाव परिसरात अनेकदा बिबट प्राणी समस्या किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर मास्टर ट्रेनर आपदा मित्र सुशांत भुजबळ व त्यांचे सहयोगी सदस्य हे घटनेची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही वेळात त्या ठिकाणी उपस्थित होऊन मदतीचे काम करत असतात त्यामुळे नागरिकांमधून यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले जात आहे.,





