बसस्थानकांत चोरट्यांचा सुळसुळाट; ऐवज चोरीच्या घटनांत वाढ

पुणे – एसटी बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, ऐन दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट एसटी स्थानकात ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली, तसेच छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटीत प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
दिवाळीत एसटी बसस्थानकांच्या परिसरात गर्दी असते. शहरात वास्तव्यास असणारे विद्यार्थी, नोकरदार गावी जातात. दिवाळीत एसटी स्थानकाच्या आवारात ऐवज चोरीला जाण्याच्या घटना वाढत असतात. एसटीस्थानकाच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त महत्त्वाचा असतो. मात्र, तसे चित्र स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकांवर दिसत नाही.
याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील रहिवासी आहेत. ते गुरुवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी पावणेसहाच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातील फलाट क्रमांक नऊवर थांबले होते. एसटी बसमध्ये प्रवेश करताना ज्येष्ठाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक आल्हाटे तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज परिसरात राहायला असून, त्या दिवाळीनिमित्त नातेवाईकांकडे आल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या पिशवीतून मंगळसूत्र, रोकड, मोबाइल संच असा ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
पोलीस हवालदार बोरकर तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर परिसरातील एसटी स्थानकाच्या आवारातून प्रवासी महिलेच्या पिशवीतून साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळीत गर्दीचा फायदा उठवत एसटी बस्थानकांच्या आवारात प्रवाशांकडील ऐवज चोरीच्या प्रकारांत वाढ झाली आहे.





