पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ब्रिटिश गायक ॲलन वाॅकर यांच्या संगीत रजनीत (लाइव्ह काॅन्सर्ट) चोरट्यांनी धुमाकूळ घातला. खराडीतील एका मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रजनीत चोरट्यांनी प्रेक्षकांकडील ३६ मोबाइल संच चोरून नेले. चंदननगर पोलिसांनी मुंबई, हैदराबादमधील चोरट्यांच्या टोळीला अटक केली. सय्यद महंमद इद्रीस शेख ( २१, रा. मुंबई), अखिल व्यंकटरमना गोदावरी ( २४ रा. हैदराबाद), लोकेश हनुमंत पुजारी ( ३१, रा. मुंबई), पप्पू भागीरथी वैश्य ( २४ रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील न्यू इंग्लिश फिनेक्स स्कूलच्या मैदानावर १८ ऑक्टोबर रोजी ब्रिटिश गायक ॲलन वॉकर लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. येथील गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. शेख, गोदावरी, पुजारी, वैश्य यांनी गर्दीत प्रेक्षकांकडील मोबाइल संच चोरले. याबाबत तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संशय आल्याने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून १४ मोबाइल संच जप्त करण्यात आले. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन ते तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.