Crime News : चाकण परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट, पोलिस यंत्रणा झोपेत?

शेलपिंपळगाव : चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या २४ तासांत ३०० मीटरच्या अंतरात दोन मोठ्या घरफोड्या आणि चार चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. शेलगाव, भोसे, रासे, वडगाव घेणंद व शेलपिंपळगाव परिसरातील घरांवर चोरट्यांनी मध्यरात्रीपासून ते भरदिवसा धाड टाकून सुमारे ३५ ते ४० तोळे सोने चांदीचे दागिने, लाखो रुपयांची रोकड आणि मौल्यवान साहित्य लंपास केले.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेलगाव येथील श्री. दत्त हायटेक नर्सरी, विजयानंद आवटे यांचे किराणा दुकान आणि भगवान झरेकर यांच्या घरावर चोरट्यांनी मोठा हात मारला. त्यानंतर मंगळवारी भरदुपारी दोनच्या सुमारास श्री. लोणारी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मौल्यवान दागिने आणि रोकड घेऊन पोबारा केलाय.
सलग घडणाऱ्या या घटनांनी पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. चोरटे मोकाट फिरत असताना पोलिस मात्र केवळ पंचनाम्यापुरते मर्यादित असल्याची तीव्र नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे. परिसरात गस्त वाढवून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





