मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पिंपरी चिंचवड दौरा; सुरक्षेच्या कारणास्तव मोठा फौजफाटा तैनात

Devendra Fadnavis |आज १८ एप्रिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पिंंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर येणार आहेत. चिंचचड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्राहलयाचा लोकार्पण कार्यक्रम त्यांच्या विशेष उपस्थित पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून कडेकोट बंदोबस्त म्हणून सरंक्षण व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी प्रशानाकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. या समारंभासाठी एकूण ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम स्थळाभोवतीच्या १७ उंच इमारतींच्या टेरेस आणि बाल्कन्या पोलिसांनी हायजॅक केल्या आहेत. या इमारतीवरून विशेष नजर असणार आहे. यासोबतच स्थानिक पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक, बॅाम्ब शोध पथक, श्वान पथक, सायबर सुरक्षा युनिट आणि गुप्तचर विभाचाही यामध्ये समावेश असणार आहे. तसेच कार्यक्रम स्थळाभोवती झोनिंग करून प्रत्येक सेक्टरवर स्वतंत्र अधिकारी आणि पोलिस तैनात असणार आहेत.
कार्यक्रमस्थळी आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यातून सर्व फुटेच थेट कंट्रोल रूमध्ये पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस नियंत्रण कक्षातून सर्व हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. कार्यक्रम स्थळाच्या आजूबाजूला ड्रोन वापरास बंदी घालण्यात आली आहे. ही संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सकाळी ६ वाजल्यापासून सक्रिय होणार असून कार्यक्रम संपल्यानंतर मान्यवर परिसरातून निघून जात नाहीत तोपर्यंत ती कायम राहणार आहे.





