पश्चिम बंगालमधील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर ! पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा हिंसाचार

नवी दिल्ली – पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्याचे वृत्त आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज भागात शुक्रवारी रात्री तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे त्या भागात जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तत्पूर्वी, दक्षिण परगणा जिल्ह्यात क्रूड बॉम्ब आणि शस्त्रास्त्रांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी तेथे शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मतदानादरम्यान गोंधळ घालण्यासाठी बॉम्ब आणि शस्त्रे ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, अद्याप काहीही सापडले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पंचायत निवडणुकीच्या तोंडावर राज्यात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. 1 जुलै रोजी पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे.
पंचायत निवडणुका एकाच टप्प्यात आज 8 जुलै रोजी होणार असून 11 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.दरम्यान राज्यातील या हिंसाचारात आमचे तीन कार्यकर्ते ठार झाल्याची माहिती तृणमुल कॉंग्रेसच्यावतीने देण्यात आली आहे.





