७ दिवसांपासून पोलिसांना चकवा! हगवणे पिता-पुत्राने या दिवसांमध्ये कसा केला प्रवास? जाणून घ्या….

Vaishnavi Hagavane death case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तिची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली असून, गेल्या सात दिवसांपासून फरार असणारा तिचा सासरा आणि दीराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई करत पिता पुत्राला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली आहे. मात्र हे दोघे बाप आणि मुलगा गेल्या सात दिवसांपासून कोठे गेले याची माहिती आता समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मे रोजी वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. तिच्या वडिलांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप करत तिचा छळ करण्यात आल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबातील सासू, वैष्णवीचा पती शशांक आणि नणंद करिश्मा यांना अटक केली. यानंतर फरार असणाऱ्या सासऱ्याला आणि वैष्णवीच्या दीराला पोलिसांनी अटक केली आहे.
17 मे पासून फरार असणाऱ्या राजेंद्र आणि सुशील हगवणे यांनी विविध ठिकाणी प्रवास केला. या दिवशी राजेंद्र हगवणे यांनी आलिशान गाडीतून औंध रुग्णलायाला भेट दिली. त्यानंतर थार गाडीतून मुहूर्त लॅान्स येथे गेले आणि तिथून वडगाव मावळमार्गे त्यांनी पवना डॅम येथील एका फॅार्म हाऊसला मुक्काम केला.
18 मे रोजी ते आळंदी येथे एका लॉजवर मुक्कामाला होते. त्याच दिवशी ते पुन्हा थार गाडीतून वडगाव मावळ येथे आले. तेथील बंडू फाटक यांच्याकडे बलेनो गाडीने प्रवास केला.
19 मे रोजी ते पुसेगाव येथील अमोल जाधव यांच्या शेतावर पोहोचले. त्यानंतर पसरणीमार्गे कोगनोळी येथील हॉटेल हेरिटेज येथे 19 आणि 20 मे या दोन दिवशी त्यांनी मुक्काम केला. त्यानंतर 21 मे आणि 22 मे रोजी प्रीतम पाटील नावाच्या व्यक्तीच्या शेतावर ते थांबले 22 रोजी ते पुण्याकडे परतत असताना त्यांना पोलिसांनी एका हॅाटेलमधून ताब्यात घेतले.
पोलिसांनी राजेंद्र आणि सुशील यांना अटक केली असून आता त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी लवकरच कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे (वय २३) वर्ष हिने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दररोज अनेक नवी माहिती समोर येत आहे. सुनेचा सासऱ्याच्या लोकांकडून छळ होत असल्याच्या वैष्णवीच्या वडिलांन पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण सर्वांनासमोर आले. वैष्णवीच्या श्ववविच्छेदन अहवाल (पोस्टमार्टेम रिपोर्ट)मध्ये देखील धक्कादायक माहिती समोेर आली होती. या अहवालात तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले होते.
वैष्णवीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक केली आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. आता पोलिसांनी सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना देखील अटक केली आहे.





