1 August Rule Change | देशभरात महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल होत असतात. आता जुलै महिना संपून ऑगस्ट महिना सुरू होत आहे. त्यापूर्वी येत्या 1 ऑगस्ट रोजी कोणकोणते बदल होणार आहेत आणि त्याचा तुमच्या खिशावर किती परिणाम होणार, याबाबत जाणून घेऊयात. एचडीएफसी क्रेडिट कार्डच्या नियमांमधील बदलांपासून ते एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीपर्यंत, हे बदल आहेत जे 1 ऑगस्टपासून लागू केले जातील. एवढेच नाही तर 1 ऑगस्टपासून आयटीआर भरण्यासाठी दंडही भरावा लागणार आहे.
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार
ऑगस्ट महिन्यापासून एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डाचे नियम बदलणार आहेत. तुम्हाला काही खर्चांवर अतिरिक्त चार्ज द्यावा लागू शकतो. क्रेडिट कार्डच्या CRED, Cheq, MobiKwik, Freecharge अॅप्सवरुन सर्व भाडे व्यवहाराच्या रकमेवर 1% शुल्क आकारले जाईल. हे शुल्क प्रति व्यवहार 3,000 रुपयांपर्यंत मर्यादित असेल.
युटिलिटी व्यवहारांवरही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. मात्र 50,000 रुपयांपेक्षा कमी व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, परंतु अशा पेमेंटचे मूल्य 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, 1 टक्के शुल्क आकारले जाईल. तसेच कार्डधारकाने 15000 रुपयांपेक्षा कमी इंधन पेमेंट केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, मात्र यापेक्षा जास्त व्यवहारांसाठी 1 टक्के शुल्क भरावे लागणार आहे.
13 दिवस बँकांना सुट्टी
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात एकूण 13 दिवस बँकांना सुट्टी आहे. तुमचे बँकिंगसंबंधात काही कामं असतील तर बँकेच्या सुट्टींची यादी पाहा. त्यामुळे नेमकी कोणत्या दिवशी बँक बंद असणार याची माहिती तुम्हाला मिळू शकेल.
ITR उशीरा भरला तर दंड
तुम्ही 31 जुलै 2024 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्ही आयटीआर फाईल केला नसेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून आणखी एक संधी मिळते. तुम्ही वर्षाअखेरपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर 2024 पर्यंत बिलेटेड रिटर्न भरु शकता. पण, तुम्हाला तुमच्या कमाईनुसार बिलेटेड रिटर्न दंड भरावा लागू शकतो. आयकर विभागाच्या नियमानुसार वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असल्यास उशिरा आयटीआर भरल्यास १,००० रुपये दंड तर पाच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर ५,००० रुपये दंड भरावा लागेल.
गुगल मॅपने नियम बदलले
भारतात गुगल मॅपने नियम बदलले आहेत जे १ ऑगस्टपासून लागू होतील. कंपनीने भारतातील आपल्या सेवांचे शुल्क 70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे, परंतु त्याचा सामान्य वापरकर्त्यांवर परिणाम होणार नाही. कारण टेक कंपनीने त्यांच्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागू केलेले नाही.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. जुलैमध्ये सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत कमी केली होती. यानंतर आता ऑगस्टमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
‘हा संघाचा खेळ आहे’ ; राकेश टिकैत यांचा उत्तर प्रदेशातील राजकीय गोंधळावर मोठा दावा