मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून, हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होईल, असा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यटनमंत्री आणि भाजप नेते पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, असं ठामपणे सांगत त्या म्हणाल्या की, मराठा आरक्षण GR काढल्यानंतर ओबीसींच्या हितांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. “आर्थिक मागासलेपणा आणि सामाजिक मागासलेपणा हे वेगळे विषय आहेत. मला हे आधीही वाटत आलं होतं आणि पुढेही तेच वाटत राहील,” असं मुंडे यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे सर्व समाज आनंदात नांदावेत, हीच प्रार्थना असल्याचं त्या म्हणाल्या. ओबीसींचे हक्क जपले जातील : पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण GR वर बोलताना ओबीसी समाजाच्या हितांचे रक्षण करण्यावर भर दिला. “मराठा समाजाला समान लाभ देताना ओबीसींचे आरक्षण बाधित होणार नाही. ओबीसीवर अन्याय होऊ नये यासाठी समिती स्थापन केली आहे,” असं त्या म्हणाल्या. राज्य सरकार सुवर्णमध्य काढेल आणि सामाजिक मागासलेल्या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होणार असं वाटत असेल, तर दोन महिने वेळ आहे. आम्ही तपासून पाहू. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे,” असं मुंडे यांनी ओबीसींना आश्वासन दिलं. त्या म्हणाल्या की, सरकार अशी पावलं उचलत आहे ज्यामुळे ओबीसींचे हक्क सुरक्षित राहतील. मराठा आणि ओबीसी यांच्यात द्वेष निर्माण होऊ नये, हीच इच्छा असल्याचं त्या म्हणाल्या.