जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी बुधवारी (दि.८) नगरपरिषद कार्यालयात उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी १० प्रभागांतील २० जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. एकूण १० प्रभागापैकी सात प्रभागांत सर्वसाधारण प्रवर्गात आरक्षण जाहीर झाले असून नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार असणार आहेत. नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे प्रभाग १, प्रभाग २, प्रभाग ५, प्रभाग ६, प्रभाग ६, प्रभाग ७, प्रभाग १० या प्रभागांत हाय होल्टेज लढत होणार आहे. यात तीन प्रभागांत खुल्या प्रवर्गात आरक्षण जाहीर झाले नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे पत्नीला उमेदवारी देण्याची तयारी सुरू होणार आहे. प्रभागातील आरक्षण पुढीलप्रमाणे- प्रभाग १ अ)- सर्वसाधारण महिला, १ ब)- सर्वसाधारण, प्रभाग- २ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग ३ अ)- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब – सर्वसाधारण, प्रभाग ४- अ- अनुसूचित जाती, ब)- सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ – अ) सर्वसाधारण महिला, ब)- सर्वसाधारण, प्रभाग ६ – अ)- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ब) – सर्वसाधारण, प्रभाग ७- अ)- अनुसूचित जाती महिला, ब) – सर्वसाधारण, प्रभाग ८ – अ)- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) -सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब)-सर्वसाधारण महिला, प्रभाग १०- अ)- अनुसूचित जाती महिला, ब)- सर्वसाधारण. चार प्रभागांत महिलाराज प्रभाग ४ सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे या गटांत आरक्षणात संधी हुकल्याने या प्रभागात इच्छुक उमेदवारांना घरचा उमेदवार द्यावा लागणार आहे. या चार प्रभागांतून खुल्या प्रवर्गातून महिला नगरपरिषदेत जाणार आहेत.