परीक्षा होणारच पण, काळजी घेऊन

अंतिम वर्ष परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांचा सावध पवित्रा
पुणे – ‘एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्याव्या लागतील. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांची चिंता संपविली पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार असल्याचे संकेत दिले. मात्र कुलगुरूंसोबत शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरनिंसगद्वारे बैठक घेतली. यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागाचे सचिव सौरभ विजयसह सर्व विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते.
या बैठकीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणे आवश्यक असल्याचे काही कुलगुरूंनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व वर्षांच्या सत्राच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून घेण्याची सूचना केली. उदय सामंत म्हणाले, संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाणार आहे.
“कुलगुरूंच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे आरोग्य, करोनाचे संकट यासह अनेक विषयांवर चर्चा केली. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या अंतिम पातळीवर आलेलो आहोत. मात्र, यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये म्हणून कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी निर्णय घेण्यात येणार आहे.
– उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री





