पिंपरी | पवना धरणात जुलैअखेर पुरेल एवढे पाणी

किवळे, (वार्ताहर) – यावर्षी पाण्याचा प्रश्न बिकट असला तरी पवना धरणात जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे, अशी माहिती पवना धरणाचे उपअभियंता अशोक शेटे यांनी दिली.
पवना धरणातून शेती सिंचन व पिण्यासाठी पाणी सोडण्यात येईल. हे पाणी जुलैअखेरपर्यंत पुरेल. साळुंब्रे, गहुंजे, किवळे, रावेत हा नदीकाठचा पट्टा विचारात घेतल्यास गेल्या काही वर्षांत मुबलक बांधकामे आनेक बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नदीचे पाणी थेट घेण्याचा प्रयत्न केला आहे.
बांधकामाचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. मावळ तालुक्यात ७४ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या हद्दीत बांधकाम करताना काहीजण बांधकाम परवाना घेतात, तर काहीजण घेत नाहीत. जे घेत नाहीत त्यांच्याकडून मार्चमध्ये रक्कम वसूल केली जाते.
पवना धरणात यावर्षी मुबलक पाणीसाठा आहे. जुलै अखेरपर्यंत पाणी पुरेल. त्यामुळे शेती सिंचन आणि पिण्यासाठी पाणी सोडण्यात येईल, असे अशोक शेटे यांनी सांगितले.





