‘एनएसएस’ नियमावलीत होणार बदल

कार्यक्रम, विशेष हिवाळी शिबिरांसाठी घ्यावी लागणार काळजी
– डॉ. राजू गुरव
पुणे – करोना पार्श्वभूमीवर यावर्षी विद्यापीठ, महाविद्यालयांना राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी शिबिरे घेताना संकटाचा सामना करावा लागणार आहे. शिवाय, नियमावलीत आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. याबाबत राज्य शासनाला मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यासाठी मुहूर्त कधी सापडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत नियमित कार्यक्रम व विशेष हिवाळी शिबिरे यासाठी प्रवर्गनिहाय विद्यार्थीसंख्या निश्चित केली जाते. महाराष्ट्रासाठी नियमित कार्यक्रमांसाठी 3 लाख 27 हजार 700, तर विशेष शिबिरासाठी 1 लाख 63 हजार 850 एवढे विद्यार्थी निश्चित करण्यात येत असतात. विद्यापीठनिहाय विद्यार्थी संख्येचे वाटपही करून देण्यात येत असते. विद्यापीठांना एनएसएसचे उपक्रम राबविण्यासाठी 2010-11 पासून सुधारित दर लागू केले आहेत. नियमित कार्यक्रमांसाठी 250 रुपये, विशेष शिबिरासाठी 450 रुपये प्रति विद्यार्थी, प्रति वर्ष या दराने निधी वितरित करण्याचे सूत्र निश्चित आहे.
करोना संकटामुळे यंदा नियमित उपक्रम व विशेष शिबिर राबवायचे कसे, असा प्रश्न विद्यापीठ, महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकाऱ्यांना पडला आहे. शासनास्तरावर विद्यापीठांच्या “एनएसएस’ विभागाच्या संचालक, अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठकही काही दिवसांपूर्वी झाली. यात बहुसंख्य संचालकांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. यांचा विचार करून सर्वांगीण मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे काम सुरू आहे. प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी, पालक यांच्यात करोनाची भीती आहे. त्यामुळे “एनएसएस’चे विशेष शिबिर राबविण्यास संबंधित गावाची परवानगी मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे, असे कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सांगितले.
असे करावे लागणार व्यवस्थापन
– विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकचे धडे द्यावे लागणार
– शिबिराचा कालावधी कमी करावा लागणार
– एकाच गावात शिबिरासाठी गर्दी करता येणार नाही
– विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करावे लागणार
– विद्यार्थी, पालकांची भीती दूर करावी लागणार
– महाविद्यालयांना उपक्रम राबविण्याची सक्ती करू नये
– शिबिरासाठी गावची परवानगी मिळविणे कठीण
– भरमसाठ उपक्रम राबविण्याला मर्यादा येणार





