“कुंडमळ्यात पुल धोकादायक असल्याची पाटी होती” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – कुंडमळा पुलाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी हा पुल धोकादायक असल्याची घोषणा आधीच केली होती. गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी पुल धोकादायक असल्याची पाटी लावली होती. तरी दुर्दैवाने काही पर्यटक त्या ठिकाणी गेले. वास्तविक आपण अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही.
मात्र, यात कोणाची चूक नाही. हा पुल इतक्या मोठ्या प्रमाणात कमकुवत झाला असेल, असे कोणाला वाटले नसेल. म्हणूनच पर्यटक त्या ठिकाणी गेले. यातून भविष्यात आपल्याला शिकण्यासारखे बरेच आहे. अशा आणखी 500 जागा असल्याची माहिती मला प्रशासनाने दिली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडले.
राज्यातील शाळांचा आज पहिला दिवस आहे. पालघरच्या दुर्वेसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरच्या शाळेत दाखल झाले. त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
काही लोक देशाच्या सैन्यावर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचेच पडलेले असते. अशा लोकांना उत्तर देण्यासाठी मी बसलेलो नाही, अशा शब्दात फडणवीसांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
कुंडमळा पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकामाला मंजुरी दिली. या पुलासाठी 8 कोटी मंजूर केले. मात्र, मंत्री महोदयांनी 80 हजारांच्या पत्रावर स्वाक्षरी केली असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आता महापालिकेतही परिवर्तन हवे
मंगळवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन केले. मागील 20 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विधानसभेत परिवर्तन केले, तसे महापालिकेत करावे लागेल, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.





