महापालिका निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’ असावी : जयंत पाटील

पुणे – येत्या पालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र यावे. या तीनही पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न असेल, असे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, “ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको ही आमची भूमिका आहे,’ असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पाटील बोलत होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी विचारले असता पाटील म्हणाले, “चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझे यांनी सांगितले होते, अनिल देशमुख यांची माझी कधी भेट झाली नाही. आता त्यांना कोणी मॅनेज करून बोलायला भाग पाडत असेल. मागील आठवड्यात भाजपचे किरीट सोमय्या यांना पालिकेत धक्काबुक्की झाली होती. यावर सोमय्या यांनी मुख्यमंत्री यांच्या आदेशावरून हल्ला झाला होता, असे म्हटले होते.
यावर विचारले असता पाटील म्हणाले की, “किरीट सोमय्या यांना सीआयएसएफचे संरक्षण आहे. त्यांना त्या यंत्रणेने संरक्षित केले पाहिजे होते. यात ते कमी पडले आहेत. मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे आहेत, असे अजिबात नाही. त्याला महत्त्व देणे योग्य नाही. सत्ता नसल्याने भाजपचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे.’
हिजाबवरून सुरू असलेल्या प्रकरणावर बोलताना पाटील यांनी सांगितले की, “भारतीय घटनेने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. कुणाचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाहीत. काही ठिकाणी जे सुरू आहे, तिथे वेगळी भूमिका घेऊन मुद्दाम हा विषय तयार करणे हा प्रयत्न आहे.’





