पालघरच्या आरोपींमध्ये एकही मुस्लीम नाही – देशमुख

मुंबई – पालघर जिल्ह्यात दोन साधूंसह तीन जणांना जमावाने बेदम मारहाण करून ठार मारल्याची जी घटना घडली आहे, यातील 101 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील एकही आरोपी मुस्लीम समाजाचा नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. या घटनेला धार्मिक रंग दिला जात आहे हे दुर्देवी आहे असे नमूद कून ते म्हणाले की हा धार्मिक विद्वेषातून झालेला प्रकार नाही.
फेसबुक संवादात त्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणावरून राजकारण करण्याची ही वेळ नाही. काही लोक यातून मोठे राजकारण रंगवण्याचे मनसुबे रचत आहेत हे दुर्देवी आहे असे ते म्हणाले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचा आदेश या आधीच देण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. पण तरीही याला काही धार्मिक वादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी हा खुलासा केला आहे.





