पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये एकूण 22.55 टीएमसी म्हणजे 77.35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एक टीएमसी जादा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही. मान्सूनचे वेळेवर झालेले आगमन त्यांनतर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. यासह परतीचा पाऊसही चांगला झाला. त्यामुळे यंदा धरणे काठोकाठ भरली. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या, खडकवासला धरणात 0.90 टीएमसी, पानशेत मध्ये 8.79 टीएमसी, टेमघरमध्ये 1.85 टीएमसी आणि वरसगाव मध्ये 11.01 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी खडकवासला प्रकल्पात एकूण 21.53 टीएमसी म्हणजे 73.86 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा धरणात चांगला पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरणातून शेतीसाठीचे आवर्तन सोडण्यात येत आहे. सध्या, 1100 क्यूसेकने पाणी कालव्यात सोडण्यात येत असून याचा फायदा हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीला होत आहे. धरणाचे नाव / पाणीसाठा / टक्के खडकवासला : 0.90 टीएमसी 45.72 टक्के पानशेत : 8.79 टीएमसी 82.56 टक्के वरसगाव : 11.01 टीएमसी 85.86 टक्के टेमघर : 1.85 टीएमसी 49.79 टक्के एकूण : 22.55 टीएमसी 77.35 टक्के