Devendra Fadnavis : भोंदूगिरीला स्थान नको.! “खरात प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून” – देवेंद्र फडणवीस
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची संपूर्ण पाळेमुळे खणून काढून, कायद्याची जरब निर्माण करु, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत व्यक्त केला.

Ashok Kharat – ज्यामध्ये सकारात्मकता, प्रामाणिकता आणि इतरांचे अहित अपेक्षित नाही ती श्रद्धा. आपण सश्रद्ध आहोत. पण श्रद्धा-अंधश्रद्धा यातील छोटी रेषा असते, तिचे उल्लंघन होऊ नये. महाराष्ट्रधर्म वाढवावा येथे भोंदूगिरीला स्थान नको.
तसेच भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची संपूर्ण पाळेमुळे खणून काढून, कायद्याची जरब निर्माण करु, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत होते. प्रस्तावावर सहभागी होताना अनेक सदस्यांनी नाशिक येथील भोंदूबाबा खरात प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला होता.आपल्या सुमारे दिड तासाच्या भाषणात फडणवीस यांनी या प्रकरणी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, मंगळवारी आपण सविस्तर निवेदन केले होते. त्यानंतरही खरात संबंधी माहिती येत आहे. ज्या ज्या सदस्यांकडे माहिती असेल त्यांनी ती शासनाकडे द्यावी. शासन कठोर शासन घडविण्यात मागे राहाणार नाही. आपल्या राज्याला महान संतांची परंपरा आहे.
सर्वांनी दुरितांचे तिमिर जावो, हिच भुमिका मांडत अंधश्रद्धेवर प्रहार केले आहेत. राज्यात जादू टोणा कायद्याची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे. विधी न्याय विभागाने मान्यता दिली आहे. मात्र या कायद्याचे कलम-३ अंतर्गत कारवाई होऊ शकते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यायसंहिता अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. इ-साक्ष प्रणालीचा वापर ८४ टक्के होतो. दहा वर्षांपेक्षा जास्त सजा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
हरवलेल्या महिला मुलींपैकी फक्त १.८६ टक्के अपहरणाची प्रकरणे असतात. विविध कारणांमुळे बाहेर गेलेल्या १ लाख ३१ हजार महिला मुली घरी परतल्या अशी आकडेवारी त्यांनी दिली.






