Tara Sutaria : ‘तुमच्यासारखं कोणीच नाही’; तारा सुतारियाने आई-वडिलांसासाठी शेअर केली खास पोस्ट
Tara Sutaria : चित्रपटांपूर्वी तिने छोट्या पडद्यावरही काम केलं असून ‘द स्वीट लाईफ ऑफ करण अँड कबीर’ आणि ‘ओये जस्सी’ सारख्या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Tara Sutaria : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया ही तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील सक्रियतेमुळेही कायम चर्चेत असते. तिचा मोठा चाहतावर्ग असून इंस्टाग्रामवर ती नेहमीच वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
आज २७ मे रोजी तारा सुतारियाच्या आई-वडिलांच्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस असल्याने तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिचे आई-वडील पिया आणि हिमांशू सुतारिया यांचा एक सुंदर फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत त्यांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या.
रेस्टॉरंटमध्ये काढलेल्या या फोटोमध्ये तिचे आई-वडील एकमेकांच्या शेजारी बसून आनंदात दिसत आहेत. या फोटोसोबत ताराने लिहिलं, “आमच्या जिवलग मित्रांना, आमच्या विश्वासूंना आणि जगातील सर्वोत्तम लोकांना लग्नाच्या ३५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
यासोबतच तिने “तुमच्यासारखं कोणीच नाही. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद,” असं म्हणत वडिलांप्रती प्रेम व्यक्त केलं.
तारा सुतारियाने २०१९ मध्ये स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने टायगर श्रॅाफ आणि अनन्या पांडे यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
चित्रपटांपूर्वी तिने छोट्या पडद्यावरही काम केलं असून ‘द स्वीट लाईफ ऑफ करण अँड कबीर’ आणि ‘ओये जस्सी’ सारख्या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर तिने ‘मरजावां’, ‘तडप’, ‘हिरोपंती २’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’ आणि ‘अपूर्वा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.
अभिनयासोबतच तारा उत्कृष्ट गायिका असून पियानो वादनातही ती पारंगत आहे. नुकतीच ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकली होती. तिच्या स्टायलिश लूकची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. लवकरच ती ‘टॉक्सिक’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
दरम्यान, तारा सुतारिया तिच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. अभिनेता वीर पहारिया याच्यासोबत तिचं नाव जोडलं जात असून दोघांना अनेक कार्यक्रम आणि डिनर डेटवर एकत्र पाहिल्यानंतर डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.





