‘अमेरिकेचा कोणी राजा नाही’; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर..

Protests Against Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर निर्णयांविरोधात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात आहेत. न्यू यॉर्क, वॉशिंग्टनसह इतर शहरातील हजारो लोकांनी शनिवारी (19 एप्रिल) एकत्र येऊन रॅली आणि मोर्चे काढले, ज्यामध्ये ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध करण्यात आला आहे.
न्यूयॉर्कच्या मुख्य लायब्ररीच्या बाहेरील चौकात हजारो लोक रस्त्यावर आले आहेत. त्यांनी ‘अमेरिकेचा कोणी राजा नाही’, ‘हिटलरशाही चालणार नाही’, ‘अत्याचाराचा प्रतिकार करा’, अशा घोषणा लिहिलेले पोस्टर हातात झळकवून आंदोलन केले आहे. या आंदोलकांचा बहुतांश रोख हा ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणांविरुद्ध होता. नो आयसीई, नो फियर, स्थलांतरितांचे येथे स्वागत आहे, असे देखील पोस्टर झळकत होते.
निदर्शनकर्त्यांनी नोकऱ्यांमधील कपात, आर्थिक धोरणे आणि नागरी स्वातंत्र्यांचे उल्लंघन याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर आरोप केला की, ते कायद्याचे शासन कमकुवत करत आहेत आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन करत आहेत. यापूर्वी 17 फेब्रुवारीला ‘नो किंग्स डे’ निदर्शन झाले होते.ट्रम्प यांनी सोशल मीडियावर स्वतःला ‘किंग’ म्हटल्याने हे निदर्शन आणखी महत्त्वाचे ठरले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकल्यानंतर आधी अमेरिकेतून लाखो सरकारी लोकांना नोकरीवरून काढून टाकले होते. खर्च कमी करण्याचा उद्देश यासाठी देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अमेरिकन लोकांना खाण्यापिण्यापासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पुरविणाऱ्या देशांवर जादा टॅरिफ लादले आहे. यावरून चीनसोबत सध्या वाद निर्माण झाले आहेत. Protests Against Donald Trump |
नागरिक कोणत्या गोष्टींमुळे नाराज आहेत?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारविरोधातील निदर्शनांची अनेक कारणे समोर आली आहेत. त्यांच्या टॅरिफ धोरणांमुळे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. ज्यामुळे शेअर बाजार घसरला तसेच बेरोजगारी वाढली. सरकारी नोकऱ्यांमधील कपात, मानवाधिकारांवरील प्रश्न आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरील निर्बंध हे देखील लोकांच्या रागाचे कारण ठरले आहेत. Protests Against Donald Trump |
निदर्शनकर्त्यांच्या मागण्या काय आहेत?
निदर्शनाचे आयोजन करणाऱ्या गटाच्या प्रवक्त्या हीदर डन यांनी सांगितले की, हे शांततापूर्ण आंदोलन आहे आणि कोणालाही हानी पोहोचवण्यासाठी नाही. याचा उद्देश देशाला एकत्र करणे आणि संविधानाचे रक्षण करणे आहे. या आंदोलनात डेमोक्रॅट, स्वतंत्र आणि रिपब्लिकन यांसारख्या विविध विचारसरणीचे लोक एकत्र येत आहेत. ट्रम्प सरकारच्या हुकूमशाही वृत्तीपासून देशाच्या लोकशाहीचे रक्षण व्हावे. दरम्यान, ट्रम्प सरकार विरोधात महिन्याभरात दुसऱ्यांदा अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली आहे. याआधी 5 एप्रिल रोजी ट्रम्प सरकार विरोधात संपूर्ण अमेरिकेत मोठे आंदोलन झाले होते.
हेही वाचा:





