‘सीमा सुरक्षेत कसलीही तडजोड नाही’ – गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली – सरकारला सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. परंतु त्यासाठी सरकार भारताच्या सीमा आणि तेथील लोकांच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मोदी सरकारने अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जम्मू आणि काश्मीर, ईशान्य आणि वामपंथी अतिरेकी प्रभावित क्षेत्र या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेे.
फोर्जिंग इंडियाज रेझिलिएंट फ्युचर’ या विषयावरील परिसंवादात बोलताना शहा म्हणाले, आमचे बाह्य आणि अंतर्गत धोरण स्पष्ट आहे. आम्हाला इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. मात्र देशाच्या सीमा आणि लोकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
इतर देशांनी सरकारच्या या धोरणाचा आदर केला आहे. पूर्वीच्या सरकारांनी तुष्टीकरणाच्या धोरणामुळे अंतर्गत सुरक्षेच्या अनेक समस्या निर्माण केल्या. त्यामुळे अनेकदा शेजारी देशांच्या थेट आणि छुप्या आक्रमणाला मोडून काढण्यात आमचा वेळ आणि ऊर्जा गेली.
शहा म्हणाले की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या जम्मू-काश्मीर, ईशान्य आणि डाव्या अतिरेकी प्रभावित क्षेत्रांमध्ये मागील सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे परिस्थिती बिघडली आहे. मोदी सरकारने या क्षेत्रांवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले आहे आणि ही क्षेत्रे आता भारताच्या विकासाच्या प्रवासाचा भाग आहेत, असेही ते म्हणाले.





