पूजा चव्हाण प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ नाही; तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट

पुणे – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही निर्दोषत्व बहाल करण्यात आलेले नाही. बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या युवतीने वानवडी भागातील हेवन पार्क इमारतीतील सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना 7 फेब्रुवारी 2021 रोजी घडली होती.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी तत्कालिन वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव जोडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. राठोड यांना या प्रकरणावरून मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास बंद (क्लोजर रिपोर्ट) करण्यात आलेला नाही. तिच्या पालकांनी सुरूवातीला त्यांची कोणाविरोधात तक्रार नसल्याचे जबाबात म्हटले होते, असे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी वानवडी पोलिसांनी पूजाच्या पालकांचा नव्याने जबाब नोंदविला आहे. या जबाबात त्यांनी त्यांची कोणाविरोधात तक्रार नसल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
पूजाच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना निर्दोषत्व बहाल करण्यात आल्याचे वृत्त समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आले होते. हे वृत्त निराधार असल्याचे पोलिसांनी सांगितले





