Narendra Modi : “माझ्या नसांमध्ये रक्त नव्हे, गरम सिंदूर वाहतोय” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बिकानेर – आता माझ्या नसांमध्ये गरम रक्त नाही, तर सिंदूर वाहत आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल. भारताच्या पाण्यावर पाकिस्तानला हक्क मिळणार नाही, हा आमचा निर्धार आहे. या संकल्पाला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. आम्ही २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ सर्वात मोठे अड्डे उद्ध्वस्त केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरोधी भावनांना वाट करुन दिली.
राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्याच्या दौऱ्यावर एका सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर थेट निशाणा साधला. भारतीय सैन्याने पाकिस्तानवर सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर राजस्थानला त्यांचा हा पहिलाच दौरा होता. यादरम्यान त्यांनी २६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट दिली. तसेच देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले. या सर्व रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत करण्यात आला.
नरेंद्र मोदी म्हणाले, जेव्हा सिंदूर सुरुंगात बदलतो, तेव्हा काय होते, हे पाकिस्तानला समजले आहे. मित्रांनो, हा योगायोग आहे की, पाच वर्षांपूर्वी बालाकोटमध्ये हवाई हल्ला झाला, तेव्हा माझी पहिली जाहीर सभा राजस्थानमध्ये झाली होती. या शूर भूमीच्या प्रभावामुळेच असा योगायोग पुन्हा घडला आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर, आता माझी पहिली जाहीर सभा बिकानेरमध्ये होत आहे. ज्यांनी भारताचे रक्त सांडले, आज त्यांना त्याच्या प्रत्येक थेंबासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. ज्यांना वाटले होते की, भारत गप्प राहील; ते आज त्यांच्या घरात लपून बसले आहेत. ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा अभिमान होता ते आज ढिगाऱ्यांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
पाकिस्तान एक गोष्ट विसरला आहे की, मोदींचे मन थंड आहे आणि थंडच राहते, पण मोदींचे रक्त गरम आहे. आता भारताने स्पष्ट केले आहे की पाकिस्तानला प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागेल. ही किंमत पाकिस्तानच्या लष्कर आणि अर्थव्यवस्थेला मोजावी लागेल. हा सूड नाही तर न्यायाचा एक नवीन प्रकार आहे.
हा नुसता राग नाही, तर हे शक्तिशाली भारताचे उग्र रूप आहे. हे भारताचे नवे रूप आहे. आधी त्यांनी घरात घुसून हल्ला केला, आता त्यांनी थेट छातीवर हल्ला केला आहे. दहशतवादाची फळे चिरडून टाकण्याचे हे धोरण आहे, ही पद्धत आहे आणि हा नवा भारत आहे.
अणुहल्ल्याची भीती घालू नका
ऑपरेशन सिंदूरने तीन नियम निश्चित केले आहेत. जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. हे देशाविरुद्धचे युद्ध मानले जाईल. त्यासाठीची वेळ सैन्य ठरवेल. आता भारत अणुबॉम्बच्या धमकीने घाबरणार नाही. दहशतवादी आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे सरकार हे समान मानले जाईल.
जगभर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताने सात वेगवेगळे शिष्टमंडळे पाठवली आहेत. पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगाला दाखवला जाईल. आता पाकिस्तानशी ना व्यापार होणार ना चर्चा. जर काही चर्चा झाली तर ती फक्त पीओके (पाकव्याप्त काश्मीर) बद्दल असेल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.





