Kriti Sanon: ‘बॉलिवूडमध्ये महिलांसाठी अजूनही आव्हाने आहेत’; लिंगभेदावर कृती सेननचं स्पष्ट मत
Kriti Sanon कृतीच्या मते, पूर्वी अनेक चित्रपटांची कथा ही मुख्यतः नायकाभोवती फिरायची. अशा चित्रपटांमध्ये अभिनेत्रीची भूमिका बहुतेक वेळा केवळ नायकाच्या प्रेमिकेपुरती मर्यादित असायची. मात्र गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीत सकारात्मक बदल झाले आहेत. महिलांसाठी अधिक सक्षम, अर्थपूर्ण आणि महत्त्वाच्या भूमिका लिहिल्या जात आहेत. तरीही लिंगभेद पूर्णपणे संपलेला नाही, असे तिचे मत आहे.

Kriti Sanon: अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या ‘कॉकटेल २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याचदरम्यान तिने बॉलिवूडमधील महिलांना येणाऱ्या अडचणी आणि लिंगभेदाबाबत स्पष्टपणे आपले मत मांडले आहे. तिच्या मते, चित्रपटसृष्टीत आजही महिला कलाकारांना पुरुष कलाकारांच्या तुलनेत वेगळ्या नजरेने पाहिले जाते. तसेच प्रश्न विचारणाऱ्या अभिनेत्रीला अनेकदा ‘अवघड’ किंवा ‘जास्त प्रश्न विचारणारी’ अशी प्रतिमा दिली जाते.
एका मुलाखतीत कृतीने सांगितले की, तिने मॉडेलिंग, अभियांत्रिकी शिक्षण आणि चित्रपटसृष्टी अशा विविध क्षेत्रांत काम केले आहे. मात्र या सर्व क्षेत्रांपैकी बॉलिवूडमध्येच तिला सर्वाधिक आव्हानांचा सामना करावा लागला. करिअरच्या सुरुवातीच्या काळात महिलांसाठी संधी आजच्या तुलनेत खूपच कमी होत्या, असेही तिने नमूद केले. (Kriti Sanon)
कृतीच्या मते, पूर्वी अनेक चित्रपटांची कथा ही मुख्यतः नायकाभोवती फिरायची. अशा चित्रपटांमध्ये अभिनेत्रीची भूमिका बहुतेक वेळा केवळ नायकाच्या प्रेमिकेपुरती मर्यादित असायची. मात्र गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीत सकारात्मक बदल झाले आहेत. महिलांसाठी अधिक सक्षम, अर्थपूर्ण आणि महत्त्वाच्या भूमिका लिहिल्या जात आहेत. तरीही लिंगभेद पूर्णपणे संपलेला नाही, असे तिचे मत आहे. (Kriti Sanon)

Kriti Sanon
चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान पुरुष आणि महिला कलाकारांसाठी वेगवेगळे निकष लावले जातात, असेही कृतीने सांगितले. ती स्वतः भूमिका आणि दृश्यांबाबत दिग्दर्शक किंवा निर्मात्यांना प्रश्न विचारते. एखादा पुरुष अभिनेता असे प्रश्न विचारला तर त्याला कामाबाबत जागरूक किंवा व्यावसायिक समजले जाते. मात्र महिला अभिनेत्रीने तसेच प्रश्न विचारले तर तिला ‘जास्त बोलणारी’ किंवा ‘खूप प्रश्न विचारणारी’ असा शिक्का लावला जातो, असे तिने स्पष्ट केले.
तिच्या मते, कलाकाराने आपल्या भूमिकेबाबत प्रश्न विचारणे किंवा चर्चा करणे ही व्यावसायिक कामाचा भाग आहे. मात्र महिलांकडे अजूनही वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. त्यामुळे चित्रपटसृष्टीत समानतेसाठी अजूनही प्रयत्न करण्याची गरज असल्याचे तिने सांगितले. (Kriti Sanon)
कृतीने असेही नमूद केले की, आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. महिला-केंद्रित चित्रपटांची संख्या वाढत असून अभिनेत्रींना स्वतःची क्षमता दाखवण्याची अधिक संधी मिळत आहे. तरीही लिंगभेदाची मानसिकता पूर्णपणे बदलण्यासाठी वेळ लागेल. (Kriti Sanon)
दरम्यान, कृती सेनन नुकतीच कॉकटेल २ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात झळकली. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरी बॉक्स ऑफिसवर त्याने जगभरात सुमारे १३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या कृतीने तिच्या पुढील चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही.
कृती सेननच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील लिंगभेद, महिलांना मिळणाऱ्या संधी आणि समान वागणुकीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.





