काबूल – अफगाणिस्तानमधील तालिबानच्या हंगामी सरकारमधील मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारीत मंत्रिमंडळात पुन्हा एकदा कोणत्याही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. प्रारंभीच्या काळात महिलांप्रती उदारमतवादी धोरण स्वीकारल्याचा भास तालिबानने निर्माण केला होता. मात्र कट्टरवादाच्या बाबतीत आपले धोरण तालिबानने दुपटीने कठोर केले आहे.
महिलांना मंत्रिमंडळात नंतर समाविष्ट करण्याची शक्यता मंगळवारी एका पत्रकार परिषदेत तालिबान सरकारचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद याने व्यक्त केली. मात्र त्याबाबत कोणतीही ठाम भूमिका स्पष्ट केली नाही. इस्लामिक कायद्यानुसार मुलींना शाळेत आणि महिलांना कामावर जाऊ देण्याबाबतचे नियम तयार केले जात आहेत, असेही त्याने सांगितले. मात्र हे नियम कधीपर्यंत तयार होतील हे देखील त्याने सांगितले नाही.
मंत्रिमंडळातील नवीन सदस्य राज्यमंत्री दर्जाच्या पदावर काम करणार आहेत. त्यामध्ये हाजरा सारख्या अल्पसंख्य समुदायाचे प्रतिनिधीही आहेत. तांत्रिक कौशल्याच्या आधारे हे सर्व जणांची निवड करण्यात आली आहे, असेही जबीहुल्ला मुजाहिद याने सांगितले.