रावेतमधील रस्त्यावर खड्डे, पदपथही नाहीत; नागरिकांनी चालायचे तरी कोठून? महापालिकेचे दुर्लक्ष

रावेत : रावेत परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शिंदे वस्ती, मस्के वस्ती, भोंडवे वस्ती यांसारख्या भागांतील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी पदपथच नसल्याने वाहनांच्या गर्दीतून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचू लागले आहे. वाहनचालकांची आणि पादचाऱ्यांची मोठी कुचंबणा होते. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. परिसरातील वाढती लोकसंख्या, वसाहती आणि अवजड वाहतुकीचा भार यामुळे रस्त्यावरचा ताण अधिकच वाढला आहे. शाळेची वाहने, रुग्णवाहिका आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
अनेक ठिकाणी पदपथाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे हातगाडीधारक रस्त्यावरच आपला व्यवसाय थाटतात. दुकानदार आणि हातगाडीधारक यांच्यात नेहमी वाद निर्माण होतो. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. महानगरपालिकेकडून काही भागांत केवळ तात्पुरती डागडूजी करून खड्डे बुजवण्यात आले.
मात्र, हे उपाय अपुरे ठरत आहेत. पावसात पुन्हा खड्डे उघडकीस येत आहेत. नागरिकांनी वेळेवर आणि दर्जेदार काम करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्ते आणि पदपथाचे काम पूर्ण झाले असते, तर आज ही दयनीय परिस्थिती ओढवली नसती, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
पावसामुळे रस्त्याची आणि पदपथाची कामे सद्य स्थितीत बंद आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये डागडुजी करण्यात आली आहे. पावसाळ्यात डांबर व इतर तांत्रिक कामांमध्ये अडचणी येतात. पावसाळा संपल्यावर सगळी कामे पूर्ववत सुरू करण्यात येतील.
– चंद्रकांत मुढाळ, स्थापत्य कार्यकारी अभियंता, पिं. चिं. मनपा
रावेत नव्याने विकसित झालेले शहर आहे. त्यामुळे शहर विकासामध्ये अनेक गोष्टीचा अभाव हा प्रकर्षाने जाणवतो. या संदर्भात अनेक वेळा अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यात आली आहे. पदपथ अभाव ही त्यातील च एक गोष्ट आहे. रस्त्यावरील खडे बुजविण्यासाठी सारथीवर तक्रार केल्यावर त्या तक्रारींचा पाठपुरावा केल्याशिवाय तक्रारीचे निराकरण होत नाही. अनेक वेळा तक्रार केल्यावर तक्रारदाराचा अभिप्राय न घेताच तक्रार बंद करण्यात येते.
– हितेश रहांगडाले, रावेत सोसायटी फेडरेशन सदस्य
चंद्रभागा कॉर्नर येथील रस्तावर पावसानंतर पाणी साचणे ही आता नित्याची बाब झाली आहे. तसेच पाणी साचल्यानंतर खड्डेही दिसत नाहीत. त्यामुळे दुचाकींचा अपघात होण्याचा धोका वाढत चालला आहे. तसेच रावेतमध्ये काही गृहप्रकल्पची कामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे अवजड वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पालिकेकडून बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांवरील भराव टिकत नाही. त्यामुळे परिस्थिती परत पूर्ववत होते.
– सोमनाथ गुरव, चेअरमन, मधुरांगण सोसायटी, रावेत चंद्रभागा कॉर्नर.
याकडे हवे महापालिकेचे लक्ष
रावेतमधील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पदपथांच्या अपूर्ण कामामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते.
खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका
वाढत्या वसाहती आणि अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांवर वाढला ताण
शाळेची वाहने, रुग्णवाहिका याच मार्गाने जात असल्यामुळे होते अडचण
महापालिकेने काही भागांत तात्पुरत्या स्वरूपात सुरू केले डागडूजीचे काम
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण झाली असती तर टळला असता नागरिकांचा त्रास





