“माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, कोणी डोळा मारला की…”; राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत आहे.
शिंदेंच्या सेनेकडून देखील ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून अनेक नेत्यांना पक्ष प्रवेश दिला जात आहे. या सर्व घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. “माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाहीत, आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही” असं म्हटलं आहे. Raj Thackeray |
दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही
“पक्षाला १९ वर्षे पूर्ण झाली. आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडला आहे यांचे आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले. पराभव झाले तरीही या पक्षातील माणसं एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले कष्ट करत असतात. पण आताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना… तसे माझ्या पक्षात नाहीत. आज या फुटपाथवर, तिकडून कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर. आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही” असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.
“सध्या आपली पक्ष संघटना आणखी मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता पक्ष संघटनेतील प्रत्येकाला विशिष्ट असं काम नेमून देण्यात येणार आहे. ते काम प्रत्येक पंधरा दिवसानंतर तपासण्यात येणार आहे. जर महिना-दीड महिन्यात कुठला पदाधिकारी कामामध्ये टाळाटाळ करत असल्याचं जाणवले तर त्याला पदावरती ठेवलं जाणार नाही,” असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. Raj Thackeray |
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या दृष्टीने ते म्हणाले, “मी 12 तारखेला प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्याची जबाबदारी देणार आहे. यासाठी काही टीम तयार करण्यात आले असून त्या तुमच्या पर्यंत पोहोचतील. जी संघटनात्मक रचना तयार करण्यात आली आहे. त्याचे रिजल्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसतील,” असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा:
हड… कोण पिणार गंगेचे पाणी?, राज ठाकरेंनी उडवली महाकुंभमेळ्याची खिल्ली, म्हणाले…





