Omar Abdullah : …तर भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे आभार मानू – उमर अब्दुल्ला

जम्मू : पाकव्याप्त काश्मीरचा ताबा भारताने जरूर मिळवावा. त्याशिवाय, चीनने बळकावलेला भागही परत मिळवावा. तसे झाल्यास आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे आभारच मानू, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी लंडनमधील एका कार्यक्रमात काश्मीर मुद्द्यावर भाष्य केले.
पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला, चोरलेला काश्मीरचा भाग परत मिळाल्यानंतर त्या मुद्द्यावर तोडगा निघेल, असे त्यांनी म्हटले. त्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन उमर यांनी विधानसभेत भूमिका मांडली. पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याविषयी जयशंकर बोलत आहेत. त्यांच्या सरकारला कुणी रोखले आहे? कारगिल युद्धावेळी पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्याची संधी होती.
जम्मू-काश्मीरच्या नकाशाकडे पाहिल्यास एक भाग चीनकडेही असल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्याविषयी बोलले जात नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. केवळ पाकव्याप्त काश्मीरच नव्हे; तर चीनने बळकावलेला भागही परत मिळवावा, असे आव्हान त्यांनी एकप्रकारे दिले.





