“…तर येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बरबाद करतील,” मनोज जरांगेंचा फडणविसांना इशारा
Manoj Jarange | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. आझाद मैदानात मनोज जरांगे यांना एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. जरांगेंनी हे मान्य करण्यास नकार दिला असून आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“देवेंद्र फडणवीसांनी आमच्या वेदना समजून घेणं गरजेचं आहे. मराठा समाजाच्या योगदानाची मुख्यमंत्र्यांनी कदर करायला पाहिजे. फडणवीस मुंबईत कोणत्याच आंदोलकांना आझाद मैदानावर जाण्यापासून थांबवणार नाहीत आणि गरीबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे. पण आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी ही मराठ्यांची चेष्टा आहे,” असे मनोज जरांगे म्हणाले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सगळ्या महाराष्ट्रासमोर असं सिद्ध करायचं होतं की त्यांनी तर आंदोलनाला परवानगी दिली. पण यातून महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला आहे. ते न्यायालयाकडे बोट दाखवत होते. पण शेवटी परवानगी त्यांनीच दिली. त्यामुळे ते एक दिवसाचीही परवानगी देऊ शकतात आणि मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंतही आंदोलन करण्याची परवानगी देऊ शकतात. पण त्यांनी जाणूनबुजून एकच दिवसाची परवानही दिली. तुम्ही मोठं मन दाखवायला हवं होतं”, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. Manoj Jarange |
मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्याविरोधात गेली, तर… Manoj Jarange |
“फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे. शिकायला पाहिजे. गोरगरीब मराठ्यांची नाराजी अंगावर घेतली की, पुढच्या काळात काय होईल? मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्याविरोधात गेली, तर येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बरबाद करणारे असतील, यांचं बहुमताचं सरकार मराठ्यांच्या मतांवरच आलं आहे,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
‘मराठे गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाही’
“देवेंद्र फडणवीसांना आता योग्य संधी आहे. संधीचं सोनं करा. मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी आहे. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. हेच मराठे गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाही हा आमचा शब्द आहे”, असंही जरांगे पाटील म्हणाले. Manoj Jarange |
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी बुधवारी ते आंतरवली सराटीमधून निघाले. गुरुवारी सकाळी जुन्नरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मोठ्या जमावाने स्वागत केलं. Manoj Jarange |
हेही वाचा:
Rishi Panchami 2025: आज ऋषी पंचमी! तिथीनुसार करा सप्तऋषींचे पूजन





