…तर बॅंकांवर कारवाई करा

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश
पुणे – महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभार्थी शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या. तर कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच मंजूर पीक कर्ज कमी प्रमाणात वाटप करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करा, असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले.
राज्यात सरासरी (51%) पेक्षा कमी खरीप पीक कर्ज वाटप असलेल्या राज्यातील 12 जिल्ह्यांची आज सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर आयुक्त डॉ. आनंद जोगदंड, राज्यस्तरीय बॅंकर्स समितीचे समन्वयक बाळासाहेब तावरे यांच्यासह जिल्हाधिकारी, सहकार विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार, अमरावती, बुलढाणा, वाशिम व वर्धा या कमी कर्जवाटपाचा आढावा घेतला.
बॅंकांना शाखानिहाय प्राप्त कर्जमाफीची रक्कम व संबंधित लाभार्थ्यांना पीक कर्ज वाटपाची गावनिहाय वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करून बॅंकांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा, असे निर्देश बाळासाहेब पाटील यांनी दिले.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसा कर्जपुरवठा होणे आवश्यक आहे. सहकार विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बॅंकांनी कर्ज वाटपाची कार्यवाही करावी. तसेच पीक कर्ज घेण्यास इच्छुक, पात्र शेतकरी तसेच कर्जमाफी योजनेचे लाभार्थी शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी
– बाळासाहेब पाटील, सहकार व पणनमंत्री





