तेव्हा मी ‘पायलट’ अन् फडणवीस ‘को-पायलट’ होते; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

अमरावती – येथील विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या 2014 ते 19 काळात 2019 ला विमानतळाच्या कामाची सुरुवात झाली. पण मग मधले जे काही सरकार आले, त्या सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे काम बंद झाले.
पुन्हा 2022 ला जेव्हा तुमच्या मनातले सर्वसामान्यांच्या मनातले महायुतीचे सरकार आले. त्यामुळे अतिशय कमी वेळात आपण अमरावती येथील विमानतळाचे काम खऱ्या अर्थाने सुरू करू शकलो. त्यावेळेस विमानाचा पायलट मी होतो आणि को-पायलट देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा होते. मात्र आता देवेंद्रजी पायलट आहे आणि आम्ही दोघे को पायालट, असे मिश्किल वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.
शिंदे पुढे म्हणाले की, पायलटची सीट बदलली तरी विकासाचे विमान हे कायम तेच आहे आणि आम्ही त्याच गतीने समोर जात आहोत. कारण आमचे इंजिन तेच आहे. मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत असताना अनेकांनी या विकासकामाला विरोध केला. मात्र आम्ही ते काम करून हा महामार्ग विकासाचा महामार्ग असल्याचे सिद्ध करून दाखवले. समृद्धी महामार्गाच्या वेळी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मी रस्त्यावर उतरून काम केले आणि काम करून दाखवले.
मुंबईतील कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल, नव्या मुंबईतील विमानतळ असेल असे अनेक विकासकामे आम्ही गेल्या अडीच वर्षाच्या काळात मार्गी लावले आहे. समृद्धी महामार्गात काही लोकांनी आडमुठी भूमिका घेतली. आधीचे लोक सत्तेत होते त्यांना केवळ अडचणीचा पाढा पाठ होता, विकासाचा पाढा त्यांना पाठ नव्हता, असा हल्लाबोल शिंदे यांनी विरोधकांवर केला.
पालघर येथेही नवे विमानतळ करणार
यावेळी एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केले. विरोधक अफवा पसरवत आहे, पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. टप्याटप्यामध्ये सर्व योजना सुरू करू.
पेपर मिस्टिकवाले आमचे सरकार नाही. हे डबल इंजिन सरकार आहे. गेल्या 10 वर्षात 86 विमानतळ झाली असून आगामी काळात मोदीजींच्या मार्गदर्शनात अजून काम आम्हाला करता येणार आहे. आम्ही पालघर येथे देखील नवे विमानातळ करणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.





