मुंबई – विधानसभा निवडणुकांनंतर राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले. शिवसेनेने भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेच्या या खेळीमुळे भाजपवर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली.
त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी विरोधात भाजप असा सामना रंगलेला दिसतो. अशातच माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी आज एक ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी ( NCP ) काँग्रेसच्या नेत्याने, ‘देवेंद्रजी तुम्हाला लवकरच संधी मिळेल’ असं विधान करत प्रत्युत्तर दिलंय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करतानाच एक फोटो ट्विट केला होता. फोटोसोबत लिहलेल्या संदेशात त्यांनी, मुंबईमध्ये असा प्रवास करण्याचा योग्य कधी येईल? असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला.
दरम्यान, त्यांच्या या ट्विटवर आता राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर देताना, “मुंबई मेट्रो-३ हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही. परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे, अशी मुंबईकरांची भावना आहे.”
“त्यामुळे केंद्रासोबत आपण जर संवाद साधलात तर प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकेल आणि तुम्हालाही मुंबई मेट्रो-३ मध्ये प्रवास करण्याची व फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळेल”
“देवेंद्र फडणवीस यांना फोटो काढून ट्वीट करण्याची व फिरण्याची संधी मिळावी ही मुंबईकरांचीही अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार मुंबईत मेट्रो-३ लवकरच सुरू करेल याचा मला विश्वास आहे.”
“सरकार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु वारंवार केंद्राकडून मदतीऐवजी आडकाठी होत आहे. असे प्रकार थांबले तर मुंबईकरांना लवकर दिलासा मिळेल” असंही तपासे यांनी म्हटलंय.