Ramdas Athawale : “तर देशाचा पंतप्रधान एखादा दलित बनेल” – रामदास आठवले

नवी दिल्ली – सर्वच राजकीय पक्ष आता बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यात देशातील दलित राजकारणाची आघाडी तयार झाली तर त्याचे नेतृत्व बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी करावे, असे आवाहन आरपीआयचे अध्यक्ष आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
देशातील दलित नेत्यांचे ऐक्य व्हावे, अशी माझी मनःपूर्वक इच्छा आहे. असे झाले तर सर्वांनी बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये यायला हवे. या आघाडीचे नेतृत्व मायावतींना देण्यात मला खूप आनंद होईल. कधीकाळी इंडिया आघाडीप्रमाणे ‘नॅशनल दलित फ्रंट’ची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये माझ्यासह रामविलास पासवान, उदित राजजी आदी सहभागी झालो होतो.
राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र आलो तर देशाचा पंतप्रधान एखादा दलित बनेल. दलित राजकारणाच्या एकतेसाठी मायावतीजी जर एक पाऊल पुढे आल्या, तर मी दहा पाऊले मागे जाण्यास तयार आहे. दलित राजकारणाच्या आघाडीचे नेतृत्व मायावतींनी स्वीकारले, तर देशात मोठा बदल होऊ शकतो, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सर्वात पहिली मागणी मी केली होती. मात्र आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, असा पुन्नरुच्चार करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व वर्गांना सोबत घेऊन चालणारे मुख्यमंत्री आहेत, पण आरक्षणाच्या मुद्द्यावर यांच्या विरोधात कटकारस्थान सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
देशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण मिळत आहे, पण मराठा समाजातही आर्थिकदृष्ट्या
कमकुवत लोकांची मोठी संख्या आहे. देशातील गरीब पाटीदार, पटेल, रेड्डी यांनाही आरक्षण मिळायला हवे. मात्र ओबीसी व एससी, एसटीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणे आवश्यक आहे. मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व वर्गांना सोबत घेऊन चालणारे मुख्यमंत्री आहेत. या वेळीही त्यांनी आपले हेच सर्वसमावेशक रूप दाखवले. एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन आले, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले.
फडणवीसांना कोणतेही पद घ्यायचे नव्हते, पण वरिष्ठांनी त्यांना पद घेण्याची विनंती केली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम केले. १३२ जागा मिळवणाऱ्या भाजपच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवणे योग्य निर्णय होता. आता देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे चांगले काम करत आहेत, असेही आठवले यांनी नमूद केले.
मतचोरी आरोपाविषयी बोलतानाआठवले म्हणाले की, लोकशाहीत मतदानाची चोरी होऊ शकत नाही. निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार होऊ नये. एकाच व्यक्तीने दोन ठिकाणी मतदान करू नये. मतदार यादीतील त्रुटी आधीही समोर येत होत्या, ज्यात सुधारणा सुरू असते. भाजपला आरक्षण संपवायचे आहे आणि संविधान बदलायचे आहे, असा आरोप राहुल गांधींसह विरोधी पक्षांनी केला. याचा फटका भाजप नेतृत्त्वाखालील एनडीएला बसला. यापूर्वी काँग्रेसचे पंतप्रधान कधीच बाबासाहेबांचे नाव घेत नव्हते.
२०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्त्वाखालील एनडीएने ४०० पारचा नारा दिला होता; पण प्रत्यक्ष निकालवेळी आमची संख्या कमी झाली. त्यावेळी आम्ही असा आरोप केला नाही की, काँग्रेसने आमची मते चोरली. राहुल गांधींच्या आरोपांमुळे आमच्या जागा कमी झाल्या. लोकशाहीत ज्याला बहुमत मिळते त्याचे सरकार येते; पण महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची मतदानाची चोरी झाली, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.
लवकरच प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपेल, असा दावा भाजप नेत्याने केला आहे. मात्र तो तथ्यहीन आहे. लोकसभेत माझ्या पक्षाचा एकही सदस्य नाही, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सलग तिसऱ्यांदा मंत्री बनवले आहे. आज माझा पक्ष भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. भाजप आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीच सन्मानजनक व्यवहार करते. भाजप, नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या मदतीने मी माझ्या पक्षाला देशभरात वाढवले आहे, असेही रामदार आठवले यांनी सांगितले.





