खासगी डॉक्टरांकडून होतेय रुग्णांची लूट

जिल्ह्यात डेंग्यूच्या आजाराने घातले थैमान : सरकारी रुग्णालयांत उपाचारासाठी बेड नाही उपलब्ध
पुणे – जिल्ह्यात साथीच्या आजारांसह डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी बेड उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालये डेंग्यूच्या नावाखाली रुग्णांना “ढिगभर’ रकमेचे बिल देऊन त्यांची लूट करत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून या रुग्णालयांना वेळीच लगाम लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अस्वच्छता, डासांची वाढती पैदास आणि हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यासह डेंग्यू आणि चिकुनगुणियाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्णांची शासकीय रुग्णालयांत गर्दी झाली आहे. अशा परिस्थितीत डेंग्यूच्या रूग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागत आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टर आणि पॅथीलॉजी लॅबकडून रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी केला आहे. दरम्यान, सर्दी, ताप असताना विनाकारण रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये ऍडमीट करून घेतले जात आहे.
रिपोर्टमध्ये दिसून येते विसंगती
मुळात जो आजार औषधोपचार आणि खाण्यामध्ये पथ्य पाळल्यावर आठ दिवसांत बरा होईल, अशा रुग्णांनाही डॉक्टरांकडून ऍडमीट करून घेतले जाते आणि हजारो रुपयांच्या बिलाची पावती फाडतात. धक्कदायक बाब म्हणजे एकाचवेळी वेगवेगळ्या लॅबमध्ये रक्त तपासणी केली तर येणाऱ्या रिपोर्टमध्ये विसंगती दिसून येते. त्यामुळे या खासगी डॉक्टरांकडून सर्रासपणे लूट होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या डॉक्टरांना आळा बसावा, जिल्ह्यातील साथीचे आजारांवर नियंत्रण कसे आणता येईल, आरोग्याचे धोरण काय असावे यासाठी तात्काळ विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी मागणी आशा बुचके यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात खासगी रूग्णालयांकडून अशाप्रकारची लूट होत असेल तर ही गंभीर बाब आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, आरोग्य अधिकाऱ्याकडून तात्काळ चौकशी करण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात येईल.
– विश्वासराव देवकाते, अध्यक्ष जि. प. पुणे
डेंग्यूच्या आजाराबाबत शासनाने परिपत्रक काढले आहे. डेंग्यूची लक्षणे आढळल्यास रूग्णांना तपासण्या करण्यास सांगितल्यास मर्यादित फी आकारण्यात यावी अशा सूचना आहे. या पेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्यास ते चुकीचे आहे. जिल्ह्यात या प्रकारच्या तक्रारी अजून तरी आलेल्या नाहीत. जर अशाप्रकारची रूग्णांची लुट होत असल्याची तक्रार आल्यास योग्य चौकशी करून संबंधित डॉक्टर किंवा रूग्णालयांवर कारवाई केली जाईल.
– डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी





