BMC News : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत चक्क चोरीची घटना घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने २० हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. या घटनेमुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कथित चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तसेच एमएस विभाग आणि सुरक्षा विभागाला देखील या घटनेची माहिती देण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? (BMC News) स्थायी समितीची काल बैठक पार पडली. या बैठकीसाठी लक्ष्मी भाटिया आल्या होत्या. त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहात आपली पर्स ठेवली होती. त्या तिथे पर्स ठेवून जेवायला गेल्या होत्या. पण जेवून आल्यानंतर पर्सला पाहिले असता पर्सची चैन उघडी होती. त्यांनी पर्स चेक केली असता त्यामधून 20 हजार रुपयांची चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. BMC News : थेट नगरसेविकेच्या पर्समधून रोकड लंपास; पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह याबाबत त्यांनी आपल्या सहकारी असणाऱ्या इतर नगरेसकांना संबंधित प्रकार कळवला. पण घटना घडली तिथे सीसीटीव्ही नसल्यामुळे या घटनेची खात्री करणे कठीण आहे. या प्रकरणी लक्ष्मी भाटिया यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांकडे लेखी तक्रार केली आहे. “स्थायी समिती म्हणजे महापालिकेची तिजोरी मानली जाते. याच ठिकाणी असा प्रकार होत असेल, तर सुरक्षेबद्दल काय म्हणायचं?” असा संतप्त सवाल लक्ष्मी भाटिया यांनी उपस्थित केला. … तर सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय? दरम्यान, मनसे गटप्रमुख यशवंत किल्लेदार यांनीही या घटनेवरून पालिकेला खडेबोल सुनावत, “सभागृहातच सुरक्षेची अवस्था अशी असेल, तर सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय? जिथे महापालिकेच्या अर्थकारणावर शिक्कामोर्तब होतो, जिथे महापालिकेचं बजेट मंजूर होतं, अशा सभागृहात चोरी व्हायला लागली तर ती महापालिका प्रशानाच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट आहे. अशा घटना घडता कामा नयेत. पण ती घटना घडलेली असेल तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे,” अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या प्रकारामुळे पालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. हेही वाचा: Actress Mrunal Thakur : अजय देवगणसोबतच्या या फ्लॅाप चित्रपटाविषयी मृणाल ठाकूरचा खुलासा म्हणाली “कोणतीही पूर्वकल्पना न देता…”